
राहाता |वार्ताहर| Rahata
येथील शनी मंदिर ते नपावाडी रस्ता तसेच शनी मंदिर ते नगरपरिषद कचरा डेपो या दोन मुख्य रस्त्यांवर पडलेले खड्डे, खडी डांबराने बुजवून व चाणखणबाबा ते नपावाडी रस्त्याच्या कडेला पथदिवे बसून नागरिकांची होणारी गैरसोय नगरपरिषदेने तात्काळ दूर करावी अन्यथा आठ दिवसानंतर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये बसून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मुन्ना सदाफळ यांनी नागरिकांच्यावतीने नगरपरिषदेला निवेदनाद्वारे दिला आहे.
राहाता नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शनी मंदिर ते नपावाडी व शनी मंदिर ते नगरपरिषद कचरा डेपो या दोन मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना या रस्त्यावरून जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे. शहरातील जवळपास 40 टक्के नागरिक या दोन रस्त्यांचा दैनंदिन कामाकरता वापर करतात. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे चारचाकी तसेच दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाहनांबरोबरच नागरिकांची आरोग्य समस्येचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरीकांना पाठीच्या मणक्यांचे विकाराचे त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे.
नगरपरिषद या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कुठलीही उपाययोजना करत नाही. परंतु कर आकारणी करण्यासाठी अट्टाहास धरते. जर नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना मुलभूत सुविधा मिळत नसेल तर येथील मालमत्ता धारकांकडून कराची आकारणी केली जाऊ नये. या दोन रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यालगत राहणार्या नागरिकांना या धुळीमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो.
रस्त्याच्या कडेला असलेले अनेक पथदिवे बंद आहे. प्रशासनला अनेकदा सांगूनही सदर पथदिवे सुरू झाले नाही. नागरिकांनी अनेकदा नगरपरिषद प्रशासनाला या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी याकरिता निवेदन दिले आहे परंतु निवेदन देऊनही प्रशासनाने यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. परिसरातील रस्त्यांबरोबरच चाणखाणबाबा ते बोठे वस्ती नपावाडी या परिसरातील रस्त्याच्या कडेला पथदिवे नसल्यामुळे जंगल प्रभागातील नागरिकांना सायंकाळी शहरात कामा निमित्त जाण्या-येण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होत आहे.
नगरपालिकेने येथील परिसरातील रस्त्याच्या कडेला तात्काळ पथदिवे बसवून नागरिकांना दिलासा द्यावा व या दोन मुख्य रस्त्यांचे डांबरीकरण करून गैरसोय दूर करावी. असे न झाल्यास परिसरातील नागरिक आठ दिवसानंतर रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यात बसून अनोख्या पद्धतीचे आंदोलन छेडतील, असा इशारा पोपटराव कोल्हे, अॅड. विजय बोरकर, प्रदीप कोल्हे, रमेश बोठे, शिवाजी आनप, बाळासाहेब बोठे ,दिलीप बोठे, सुनील पायमोडे, एकनाथ माघाडे, अशोक बोरकर, रमेश बोठे, अजय आग्रे, प्रवीण बोरकर, संजय भाकरे, निलेश गिधाड, विशाल गायकवाड, विजय गिधाड, चेतन गिधाड, विशाल गायकवाड, रंगनाथ गिधाड, विकास गिधाड, शुभम गिधाड यांच्यासह प्रभात क्रमांक 1 मधील नागरिकांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 1 मधील तसेच शनी मंदिर ते नपावाडी व कचरा डेपो या दोन मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे अत्यंत वाईट दुरावस्था झाली आहे. तसेच चाणखणबाबा ते बोठे वस्ती नपावाडी रोड या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पथदिवे नसल्यामुळे नागरिकांना वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणात भीती निर्माण होत आहे. प्रशासक चव्हाण यांनी तात्काळ या दोन्ही रस्त्यांवर पडलेल्या खड्डे खडी व डांबर टाकून बुजून द्यावे तसेच रस्त्याच्या कडेला पथदिवे बसून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी.
- अतुल बोठे, नागरिक राहाता