राहाता नगरपरिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी होण्याची शक्यता

राहाता नगरपरिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत खडाजंगी होण्याची शक्यता

राहाता |प्रतिनिधी|Rahata

आज गुरूवारी राहाता नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 13 वरून खडाजंगी होण्याची शक्यता असून काही विद्यमान नगरसेवकांनी या विषयास विरोध दर्शवत सदर विषय रद्द ठरवून वगळण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना पाठवले आहे.

या निवेदनात दि. 30 सप्टेंबर रोजी होणार्‍या ऑनलाईन सर्वसाधारण सभेची नोटीस प्राप्त झाली असूुन सदर नोटीसमधील विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 13 मध्ये शहरातील चितळीरोड लगतच्या व्यापारी संकुलाशेजारील जागेवर अतिक्रमण होत असल्याने तेथे तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड उभारणेबाबत विचारविनिमय करणे असा विषय ठेवण्यात आलेला आहे.

यापूर्वी राहाता न.पा.च्या 26 फेब्रुवारी 2021 च्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत चितळीरोड लगतच्या सदर प्रस्तावीत क्षेत्रामध्ये व्यापारी संकुलाचे बीओटी तत्वावर बांधकाम करणेबाबत विषय पत्रिकेवर बेकायदेशीर व नियमबाह्य विषय घेण्यात आला होता. त्यावेळी सात नगरसेवकांनी ठरावास विरोध केला होता. मुळात सदर सिटीसर्व्हेत गावठाण हद्दीतील प्रस्तावीत क्षेत्रातील विकास आराखड्यामध्ये सेंट्रल गोडावूनसाठी आरक्षण दाखविण्यात आलेले आहे.

सदर आरक्षण आजतागायत कायम असुन रद्द करण्यात आलेले नाही, असे असताना आज होणार्‍या सर्वसाधारण सभेत खोट्या अतिक्रमणाचे नावाखाली विषय क्रमांक 13 प्रमाणे बेकायदेशीर व नियमबाह्य ठराव सभेपुढे चर्चेला ठेवणे किंवा मंजूर करणे यास नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. या क्षेत्रात वहिवाट व वाग याबाबत न्यायालयात दावा प्रलंबीत आहे. त्यामुळे हा विषय रद्द ठरवून वगळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर नगरसेविका अनिता काळे, शारदाताई गिधाड, निलम दीपक सोळंकी, नगरसेवक सचिन विठ्ठल गाडेकर, निवृत्ती गाडेकर यांच्या सह्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व नगरसेवक सत्ताधारी गटाचे आहेत.

Related Stories

No stories found.