भूजलच्या क्लीष्ट धोरणामुळे मनरेगा विहीर योजना राहाता तालुक्याला ‘मृगजळ’

File Photo
File Photo

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

राज्यातील नवीन आलेल्या शिंदे-फङणवीस सरकारने प्रत्येक शेतकरी लखपती बनाविण्यासाठी मनरेगा अंतर्गत विहीर खोदण्यास विशेष सवलती देण्याची घोषणा केली आहे. मात्र भूजल विभागाच्या क्लिष्ट नियमांमुळे राहाता तालुक्यात चितळी गाव वगळता एकाही गावातील शेतकर्‍यांना या योजनेतून विहीर मिळणार नसल्याने तालुक्याला ही योजना मृगजळ ठरणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर अनुदान योजना राबविण्यात येत असते. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी साडेतीन लाखांपर्यंत अनुदान देण्यात येते. आता या योजनेनुसार आपल्या शेतात वैयक्तीक सिंचन विहिरीचे काम घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी 4 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार सिंचन विहीर वैयक्तिक कामासाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये दोन विहिरींमधील अंतराच्या अटीत काही प्रमाणात शिथिलता दिली आहे तर क्षेत्राची अट 65 आर वरून 40 आर करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमधून समाधानाचे वातावरण होते.

राहाता तालुक्यातील साठ गावापैकी अनेक शेतकरी हे कोरडवाहू शेती करतात. ही निसर्गाच्या भरवश्यावर शेती आहे. निसर्गाच्या भरवश्यावर शेती करणे खूप कठीण आहे. पाऊस हा अनिश्‍चित झाला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती ही सध्या धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या सिंचन विहीर अनुदान योजनांमुळे शेतकरी बांधवांना विहिरी उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार असल्याचे शासनाने चित्र उभे केले आहे. या योजनेत पात्र शेतकर्‍यांना भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जमा करावे लागते.

मात्र भूजलच्या पात्रतेच्या निकषांनुसार राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी केवळ चितळी हे एकमेव गाव बसत असल्याने शासनाची शेतकरी लखपती बनविण्याचे स्वप्न दाखविणारी सिंचन विहीर योजना राहाता तालुक्यासाठी मृगजळ ठरत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये ना. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आहेत. त्यांनी भूजल विभागाच्या या क्लीष्ट नियमावलीचा फेरआढावा घेण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत व तालुक्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com