राहाता बाजार समिती बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार?

राहाता बाजार समिती बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित होणार?

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राज्यात पशुधनाच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या राहाता बाजार समितीच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र माजी आ. स्व. चंद्रभान घोगरे गट तालुक्यात पुन्हा सक्रीय झाल्याने दरवेळी बिनविरोध होणारी निवडणुकीची परंपरा यावेळी खंडित होण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

राहाता बाजार समिती निवडणुकीचे पडघम वाजले असून प्रशासनाने 29 सप्टेंबर 2022 ला प्रारूप मतदार यादी हरकतीसाठी प्रसिध्द केली. त्यानंतर 21 ऑक्टोबर 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. यामध्ये सेवा सोसायटी मतदार संघातून 893 मतदार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात 619 मतदार, व्यापारी मतदार संघात 49, हमाल मापाडी संघात 46 असे 1607 मतदार असणारी अंतिम यादी प्रसिध्द केली आहे.

मागील टर्ममध्ये निवडणूक बिनविरोध झाली होती, मात्र गेल्या पाच वर्षात एकनाथ घोगरे व जनार्दन घोगरे सक्रीय झाले आहेत. परिवर्तन मंडळाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वात मोठ्या लोणी खुर्द ग्रामंपचायत व येथील सेवा सोसायटीवरही एकहाती ताबा मिळविण्यात त्यांना यश आले आहे. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक परंपरे प्रमाणे बिनविरोध होणार की घोगरे गटाच्या सक्रीयतेमुळे निवडणूक लागणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com