
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत खुला (लुज) कांदा खरेदी करण्यास सुरु केल्यानंतर यास शेतकर्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 125 वाहने काल कांदा घेऊन विक्रीस आले होते. 1 हजार 875 क्विंटल कांद्याचा लिलाव काल झाला.
शेतकर्यांना दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समिती प्रशासनाने खुला कांदा विक्री लिलाव करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ट्रॉली, टेम्पो मधून मोकळा कांदा आणण्यास शेतकर्यांनी प्रारंभ केला. यामुळे शेतकर्यांचा गोणीसाठी करावा लागणारा खर्च वाचला. गोण्या भरण्यास, त्या शिवण्यास लागणारा वेळही वाचल्याने शेतकर्यांनीही बाजार समितीच्या निर्णयाचे स्वागत केले व मोकळा कांदा बाजार समितीत आणण्यास प्रारंभ केला आहे.
उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी विक्री पध्दतीत बदल करण्याचा निर्णय बाजार समितीने विखे पाटील यांच्या आदेशाने घेतला.गोण्यांचा खर्च वाचल्याने शेतकर्यांना यामुळे काहिसा दिलासा मिळाला आहे. कांदा गोणीत आणला जात होता त्यामुळे गोणीचा खर्च, मजुरी, हमाली, असा खर्च सोसावा लागत होता. राज्यात कांद्याचे भाव कमी झालेले आणि त्यातच हा खर्च त्यामुळे शेतकर्यांना परवडणारे असे नव्हते. म्हणुन राहाता बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकर्यांनी जोरदार स्वागत केले.
काल 125 वाहने लुज कांदा घेऊन बाजार समितीत दाखल झाले. त्यात 1875 क्विंटल दाखल झाला. या सर्वांचा लिलाव होऊन कांदा नंबर 1 ला 1000-1303 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला कमीत कमी 550-950 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 100-500 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटलला 6300 रुपये भाव मिळाला. गव्हाला सरासरी 2150 रुपये भाव मिळाला. हरभरा डंकीला कमीत कमी 3631 रुपये, जास्तीत जास्त 4100 रुपये तर सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 2170 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर ज्वारीला सरासरी 1501 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.
आमदार विखे यांना धन्यवाद !
राहाता बाजार समितीत खुला (लुज) कांदा विक्रीचा निर्णय बाजार समितीचे मार्गदर्शक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्या बद्दल शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला. यामुळे कांदा उत्पादकांचा अर्थिक फायदाच झाल्याने आमदार विखे पाटील यांना शेतकर्यांनी धन्यवाद दिले आहेत.