राहाता बाजार समितीत कांद्याची सर्व व्यापार्‍यांनी बोली बोलावी

शेतकर्‍यांची मागणी
राहाता बाजार समितीत कांद्याची सर्व व्यापार्‍यांनी बोली बोलावी

सावळीविहीर |वार्ताहर| Savali Vihir

राहाता बाजार समितीमध्ये आठवड्यात तीन दिवस कांद्याचा लिलाव होत असतो, मात्र बाजार समितीत आलेल्या एका शेतकर्‍यांचा मालावर बाजार समितीने अधिकृत केलेल्या सर्व व्यापार्‍यांनी बोली लावल्यास शेतकर्‍यांना चढ्या भावाने कांद्यास भाव मिळण्यास मदत होणार असून सर्व व्यापार्‍यांनी खुली बोलावी अशी मागणी शिंगवे येथील शेतकर्‍यांनी प्रशासक खेडकर यांच्याकडे केली आहे.

राहाता तालुका व शेजारील तालुक्यातील येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला माल घेऊन येत असतात. पण त्यांना कटू अनुभवाला सामोरे जावे लागते. शेतकर्‍यांनी आणलेला कांदा वेगवेगळ्या आडत व्यापार्‍यांच्या शेड मधे साठवला जातो. त्यानंतर ज्या व्यापार्‍यांच्या शेडमधे माल असतो तोच व्यापारी त्यांचे दोनचार सहकार्‍यासह त्या मालावर बोली लावतो व एकटाच खरेदी करतो व सर्व माल एकच व्यापारी घेतो. त्याप्रमाणे वेगवेगळे व्यापारी एकाच वेळी ज्याचे त्याचे शेडमध्ये स्वतंत्रपणे लिलाव करतानाचे चित्र पहावयास मिळते. वास्तविकपणे शेतकर्‍यांच्या एका वक्कल ला सर्व व्यापार्‍यांनी एकत्र येऊन बोली लावली पाहीजे.

त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी ज्याचे शेड मध्ये माल टाकला आहे तो व्यापाऱी जो भाव देईल तो भाव निमूटपणे घ्यावा लागतो. भावाची नाराजी असूनही नको झंजट म्हणून माल परत घेण्याचे प्रमाण ही अत्यल्प आहे. तसेच माल वाहतूक करणारी वाहने ही कांही व्यापार्‍यांचे संपर्कात असल्याने शेतकर्‍यांचा माल ठराविक व्यापार्‍यांना त्यांचे शेडमधे विनासायास पोहोचण्यास मदत होते. याबाबत राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक खेडकर यांचे समोर ही बाब उघड केली असून लवकरच यावर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी शिंगवे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक लक्ष्मणराव दुशिंग, वाल्मिक काळवाघे, दिपक बोधक, भैय्यासाहेब दुशिंग, प्रवीण जाधव आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

शेतकर्‍यांनी लिलाव पद्धती विषयी आपणास माहीती दिलेली आहे. परंतु प्रशासक पदाची जबाबदारी आल्यानंतर सदर लिलाव प्रक्रिया कशी चालते हे मी अवगत केले नाही. परंतु मी स्वतः लिलावावेळी उपस्थित राहणार असून काही त्रुटी असल्यास नक्कीच दूर केल्या जातील.

- खेडकर, प्रशासक, राहाता बाजार समिती.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com