राहाता बाजार समितीसमोर जीवघेणा खड्डा अपघाताला देतोय निमंत्रण

खड्ड्यात वाहने अडकल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांची कसरत
राहाता बाजार समितीसमोर जीवघेणा खड्डा अपघाताला देतोय निमंत्रण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील महाकाय खड्डा जिवघेणा ठरत आहे. दररोज वाहने खड्ड्यात अडकत असल्याने अपघात घडत असून वाहनांचे देखील मोठे नुकसान होत आहे. नगर-मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे अगोदरच चाळण झाली आहे आणि त्यातच असे जिवघेणे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहे.

नगर-मनमाड महामार्गाचे शुक्लकाष्ट कधी संपणार आणि वाहनधारकांना वाहतुकीसाठी उत्तम दर्जाचा रस्ता कधी मिळणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. पावसाळा आला की बुजवलेले खड्डे पुन्हा खोलवर जातात. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्चुन रस्त्याची दुरूस्ती केली जाते. पण हे सर्व व्यर्थ जाते.

गोदावरी वसाहत येथील बाजार समितीसमोरील एक महाखड्डा वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर जलतरण तलाव आहे की काय असे चित्र तेथे रस्त्यावर पाणी साचल्याने निर्माण होेत आहे. खड्ड्यांमध्ये पाणी भरले की दररोज चार ते पाच वाहने त्यात अडकतात. स्थानिक नागरिक वाहनचालकांना मदत करून अडकलेली वाहने काढून देतात. दोन दिवसांपूर्वी एकाच दिवशी चार वाहने अडकण्याचा पराक्रम या विशालकाय खड्ड्याने केला. एक इनोव्हाही यात अडकली.वाहने आदळल्याने मोठा खर्च दुरूस्तीसाठी येतो तर अपघातात हात-पाय मोडून घेतलेल्या दुचाकीस्वारांना दवाखान्यात उपचारासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत.

या खड्ड्याची लांबी 68 फुट, रुंदी 12 फूट तर खोली एक ते दिड फुटापर्यंत आहे. दुभाजकापासून एक साईडचा रस्ता हा 24 फुटाचा आहे. यावरून लक्षात येते की, एकाच खड्ड्याचा कसा विस्तार झाला आहे. हा खड्डा सोडला तर तेथील 300 फुट परिसरात पावसाचे पाणी भरते आणि परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यात कळस म्हणजे खड्डे बुजवताना वापरण्यात येणारा मातीमिश्रीत मुरूम अन त्यामुळे उडणारा फुफाटा!

हा रस्ता जागतिक बँकेकडे वर्ग झाला आहे. सावळीविहीर फाटा ते नगर बायपास असा साधारण 75 किलोमीटरच्या महामार्गासाठी 490 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. सर्व्हे देखील सुरू आहे मात्र कामास प्रत्यक्ष सुरूवात होवून रस्त्याचे काम कधी मार्गी लागणार? हा खरा प्रश्न आहे.

बाजार समितीसमोरील खड्डा जिवघेणा ठरत आहे. संपूर्ण महामार्ग खड्ड्यात हरवला आहे. परिसरातील नागरिकांना खड्ड्यात अडकलेली वाहने काढून द्यावी लागतात. रोजची कसरत झाली आहे. वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत.

- सचिन भणगे, स्थानिक

नगर-मनमाड महामार्गाला अगोदरपासूनच शाप लागला आहे. सुरूवातीची ठेकेदार कंपनी काळ्या यादीत गेली. त्यानंतर सुप्रिम कंन्स्ट्रकशन कंपनीला काम देण्यात आले. हे निर्णय त्या त्या वेळच्या शासन पातळीवर झाले. त्यावेळी मंत्री व अधिकार्‍यांनी लक्ष घालायला हवे होते पण दुर्देवाने ते घडले नाही. रस्त्याच्या कामासाठी मी मोठे प्रयत्न केले. महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून 490 कोटी रुपयांची निविदा देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता वर्ग झाल्याने येत्या 6 महिने किंवा वर्षभरात काम पूर्णत्वास जाईल. भाविक तसेच नागरिकांचे हाल कमी होतील.

- आ. राधाकृष्ण विखे पाटील

रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून जावा लागत आहे. रस्ता दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. मात्र डागडूजी करताना फक्त मलिदा खाण्याचे काम ठेकेदाराकडून केले जात आहे. अनेक नागरिकांना अपघाताला, मरणाला व अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.

- अंकुश भडांगे, स्थानिक गोदावरी वसाहत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com