राहाता तालुक्यात खरिपाच्या 90 टक्के पेरण्या

उसाच्या आगारात सोयाबीन, मका व कपाशीचा पेरा वाढला
राहाता तालुक्यात खरिपाच्या 90 टक्के पेरण्या

राहाता | Rahata

तालुक्यात 39300 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली तर महावेध स्कायमेट कंपनीचे स्वयंचलीत हवामान केंद्रानुसार नुसार 158 मि.मी. पावसाची नोंद 1 ऑगस्ट अखेर झाली आहे. तालुक्यात 43600 हे खरिपाचे क्षेत्र प्रस्तावीत केले होते. त्यानुसार 90 टक्के खरिपाची पेरणी झाली. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात सोयाबीन, मका व कपाशी या पिकाची वाढ झाली आहे.

खरीप हंगामापर्यंत जून ते सप्टेंबर सरासरी 454 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु त्या तुलनेत 35 टक्के पाऊस झाल्याने तालुक्यात ऑगस्ट महिन्यातच विहीर व कुपनलिकांनी तळ गाठल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस कमी प्रमाणात झाला असला तरी सध्या जनावरांचा चार्‍याचा प्रश्न सुटला आहे. 4700 हेक्टर क्षेत्रावर चारा पीक उभे आहे तर 1602 हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला लागवड झाली आहे.

31 जुलैपर्यंत सोयाबीन, बाजरी, मका व इतर पेरणी शेतकर्‍यांनी केली असल्याचे कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले. यावर्षी खते व बियाणे यांचा तुटवडा होऊ नये म्हणून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कृषी विभागाला सूचना केल्या होत्या. सर्व कृषी दुकानांमध्ये पुरेसे बियाणे व खते उपलब्ध होती. खरीप सन 2021-22 यावर्षी मृग बहार हवामान आधारित फळ पीक विमा योजना अंतर्गत 1474 शेतकर्‍यांना 2 कोटी 30 लाख मृग बहार (खरीप )विम्याचा लाभ मिळाला आहे. खरीप 2021-22 या हंगामात 17 हजार शेतकर्‍यांनी विमा भरला होता परंतु पिकांंची नुकसान झालेल्या व वेळेत नुकसान झाल्याची सूचना विमा कंपनीला दिलेल्या 1800 शेतकर्‍यांना विमा कंपनीने 94 लाखांचा विमा दिला आहे.

2021-22 या वर्षात जवळपास 551 लाभार्थ्यांना 1 कोटी 91 लाख रुपये विविध प्रकारचे यांत्रिकीकरणाचा लाभ मिळाला आहे. ठिबक व तुषार सिंचन योजनेअंतर्गत 2300 लाभार्थ्यांना 4 कोटी 50 हजार अनुदान वाटप करण्यात आले असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 80 टक्के सबसिडी देण्याची योजना आहे. शेतकरी उत्पादक कंपनी यांना शेतीमालाची साठवणूक, पायाभूत सुविधा, मूल्यवर्धन व विपणन यासाठी कृषी प्रकल्प उभारणीसाठी जागतिक बँकेकडून स्मार्ट प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील 5 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्रकल्प उभारणी करण्याकरिता 7 कोटी 50 लाखांची मंजुरी देण्यात आली आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचेेेे आतापर्यंत 35 प्रस्ताव कृषी विभागाने विमा कंपनीस सादर केले आहेत. त्यापैकी 20 प्रस्ताव विमा कंपन्यांकडून मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्ताव मंजुरी प्रक्रिया चालू आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अन्न प्रक्रियेसाठी लाभार्थी यांना 35 टक्के अनुदान देण्यात येते. तालुक्यातील 61 लाभार्थ्यांनी या प्रकल्पासाठी अर्ज दाखल केले. 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून 6 प्रकल्प बँक कर्ज मंजुरी देऊन अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत 30 हजार 900 शेतकरी कुटुंबियांना 56 कोटींचे अनुदानाचे 11 हप्ते वर्ग करण्यात आले आहे. शासनाकडून शेतकर्‍यांना शेतजमिनीमध्ये कुठला घटक कमी आहे यासाठी जमीन आरोग्यपत्रिका योजना सुरू केली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत गतवर्षी 92 हेक्टर नवीन फळबाग लागवड करण्यात आली असून यावर्षी 250 हे नवीन फळबाग लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.

राहाता तालुका डाळिंब, द्राक्षे ,पेरू, चिकू या फळबागांसाठी प्रसिध्द आहे. सध्या तालुक्यात 4900 हेक्टर फळबागा उभ्या आहेत. परंतु शासनाने सुरू केलेल्या शासकिय रोपवाटिकांमध्ये फळांचे कलम उपलब्ध नाही. त्यामुळे या शासनाच्या फळ वाटिकेचा शेतकर्‍यांना फायदा काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत. खासगी रोपवाटिकेमध्ये मातृवृक्षाचा दर्जा चांगला तपासूनच फळांची रोपे खरेदी करणे गरजेचे आहे. अन्यथा फसवणूक होऊ शकते.

तालुक्यात पेरु 1254 हेक्टर, चिकू 205 हेक्टर, डाळिंब 1410 हेक्टर, द्राक्षे 410 हेक्टर, ऊस 8555 हेक्टर, कपाशी 1456 हेक्टर, बाजरी 1504 हेक्टर, मका 9666 हेक्टर, तूर 197 हेक्टर, मुग 128 हेक्टर, भुईमूग 208 हेक्टर, सोयाबीन 18127 हेक्टर व इतर पिके मिळून एकूण 39300 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार 30 जुलैपर्यंत राहाता 292, शिर्डी 196, चितळी 260, रांजणगाव 201 इतकी मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यावर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी खरीप पिकाची पेरणीत वाढ झाली आहे. सोयाबीन, मका, कपाशी या पिकांची सद्य स्थितीत वाढ चांगली आहे. परंतु काही ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत असल्याने त्यासाठी चिलेटेड फेरस 1 ग्राम अधिक 19.19.19 एन पी के 4 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणीप्रमाणे फवारणी करावी व चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता क्लोरअँड्रोनिलोप्रोल (18.5 एस सी) 0.75 मि.ली 1 लिटर प्रमाणे किंवा इंडोक्जाकार्ब 0.30 मि.ली 1 एक लिटर प्रमाणे फवारणी करावी.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com