राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा व स्वीकृत नगरसेवक राजेंद्र पिपाडा यांनी कारभारात गैरवर्तणूक केल्याप्रकरणी

तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी आयएएस आशिमा मित्तल यांनी सादर केलेल्या अहवालावर राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही न केल्याप्रकरणी जनहित याचिका न्यायालयाने दाखल करून घेत राज्य शासन, नगराध्यक्षा व नगरसेवक यांना नोटिसा काढल्या आहेत, अशी माहिती वकिल एल. व्ही. संगीत यांनी दिली.

तत्कालीन प्रभारी मुख्याधिकारी आयएएस अशिमा मित्तल यांची संपूर्ण कारभाराची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल जिल्हाधीकारी, प्रधान सचिव नगर विकास मंत्रालय यांना 23 डिसेंबर 2019 रोजी पाठविला होता. राहाता पालिकेच्या विविध कामांत तसेच कार्यालयीन कामकाजात अनियमितता झाली त्याला सर्वस्वी नगराध्यक्षा ममता पिपाडा व स्विकृत नगरसेवक राजेंद्र पिपाडा हे जबाबदार असून त्यांना हयगय व गैरवर्तणूक या कारणास्तव पदावरून दूर करावे, अशी शिफारस मित्तल यांनी केली होती.

सरकारने यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने राहाता येथील माजी नगरसेवक राजेंद्र अंबुलाल अग्रवाल यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचीका दाखल केली होती. सरकारने कोणतीही कारवाई न केल्याने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन, नगराध्यक्षा, नगरसेवक यांना नोटिसा काढल्या असून पुढील सुनावणी 10 मार्च 2021 ला ठेवलेली आहे. याचिकाकर्ते यांच्यावतीने उच्च न्यायालयातील वकील एल. व्ही. संगीत हे काम पहात आहेत.