राहाता परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांची तसेच व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान

पंचनामे करण्याच्या ना. विखे यांच्या सूचना || एकाच दिवसात 112 मिमी पावसाची विक्रमी नोंद
राहाता परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांची तसेच व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान

राहाता |वार्ताहर| Rahata

गणरायाचे आगमनानंतर बुधवारी रात्री 9 वाजता अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन व्यापारी संकुलातील तळमजल्यावर असलेल्या बहुतांशी दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यवसायिकांचे लाखो रुपयाची नुकसान झाल आहे. या बरोबरच सोयाबीन, मका, बाजरी, कपाशी व इतर खरीप पिकांची धुव्वाधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाली असून जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी ऊस जमिनीवर झोपलेले चित्र निर्माण झाल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुधवारी रात्री अचानक झालेल्या पावसामुळे राहाता परिसरातील ओड्या नाल्यांना पुराचे स्वरूप आले होते. नगर मनमाड महामार्गावर सर्वत्र जलमय परिस्थिती झाल्यामुळे अनेक तास वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. परिणामी बहुदा ठिकाणी एकेरी रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आल्याने वाहन चालकांना महामार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागली. या वर्षीच्या पावसाळ्यात परिसरात प्रथमच एका दिवसात 112 मि.मि. पावसाची विक्रमी नोंद झाली. चिकू, पेरु, डाळिंब, द्राक्षे, ऊस तसेच सोयाबीन, मका या खरीप पिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असला तरी धुव्वाधार पावसामुळे काही ठिकाणी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली. गणेश उत्सवानिमित्त शहरातील व्यापारी संकुलातील व्यावसायिक बुधवारी रात्री 9 वाजता लवकर आपले दैनंदिन व्यवहार आटपून आपापली दुकाने बंद करून घरी गेले होते. अचानक रात्री 9 नंतर झालेल्या मुसळधार पावसाने काही तासात सर्वत्र पाणीच पाणी केले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही या संकुलातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानात असलेल्या मालाचे नुकसान होऊ नये यासाठी तात्काळ दुकान उघडून पावसाचे पाणी दुकानाबाहेर कसे काढता येईल यासाठी उपाययोजना सुरू केल्या होत्या. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे नगरपरिषदेचे कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकली नाही. तसेच पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व्यावसायिकांना आपल्या दुकानातील माल दुसरीकडे हलवता आला नाही. त्यामुळे येथील व्यवसायिकांची लाखो रुपयाच्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या पावसाळ्यात 3 वेळा पावसाचे पाणी या संकुलातील तळमजल्यावर असलेल्या दुकानात शिरल्याने येथील व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. नगरपरिषदेने कायमस्वरूपी यावर उपाययोजना करून व्यवसायकांची होणारी नुकसान दूर करावी, अशी मागणी अनेकदा व्यवसायिकांनी करूनही नगरपरिषदेने यावर उपाययोजना न केल्यामुळे येथील व्यवसायकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सततत्याने होत असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी बोलून दाखवली. नगर परिषदेचे प्रशासक चंद्रकांत चव्हाण यांनी गुरुवारी येथील संकुलात भेट देऊन या ठिकाणी कायमस्वरूपी पावसाचे पाणी उपसा करण्याकरिता दोन विद्युत पंप बसवण्यात येतील असे सांगितले.

यावर्षी राहाता तालुक्यात 39 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. कऱोना संकलन नंतर यावर्षी खरिपाची चांगले पीक घेऊन त्यातून चांगले उत्पन्न येईल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती परंतु बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात जवळपास 17 हजार हेक्टर खरिपाची पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने दिला असल्यामुळे बुधवारी अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी तसेच व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ शासनाकडून मदत देण्यात यावी, अशी मागणी राहाता परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन घर किंवा शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे रितसर पंचनामे करण्याची सूचना दिल्या असून त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महसूल विभागाने तात्काळ नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून पंचनामे करण्याची कारवाई सुरू केली आहे.

- कुंदन हिरे, तहसीलदार

ज्या शेतकर्‍यांनी खरीप पिक विमा काढला आहे व ज्या परिसरात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे जलमय परिस्थिती निर्माण होऊन पिकांची नुकसान झाली अशा शेतकरी बांधवांनी तात्काळ 72 तासांच्या आत पिक विमा कंपन्यांना सूचना द्याव्यात किंवा कृषी विभागाकडे संपर्क करावा.

- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com