राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या 303 सदस्यांसाठी निवडणूक

प्रवरा परिसरातील 13 तर गणेश परिसरातील 12 ग्रामपंचायतींचा समावेश
राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या 303 सदस्यांसाठी निवडणूक

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणार्‍या ग्रांमपचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून राहाता तालुक्यातील पंचवीस ग्रामपंचायतींची रणधुमाळी सुरू झाली आहे.

यामध्ये गणेश परिसरातील बारा ग्रामपंचायतींसह प्रवरा परीसरातील तेरा ग्रामपंचायतींच्या 303 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक होणार असल्याने ऐन हिवाळ्यात राजकीय वातावरण तापणार आहे.

करोना संकट काळामुळे एप्रिल ते डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर शासनाने प्रशासक नियुक्त केले होते. मात्र करोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्याने निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष निवडणूक होत आहे.

राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या 112 प्रभागांमधील 303 सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. यामध्ये गणेश परिसरातील आडगाव बुद्रुक (3 प्रभाग 9 सदस्य), अस्तगाव (6 प्रभाग 17 सदस्य), एकरूखे (5 प्रभाग 13 सदस्य), जळगाव (4 प्रभाग 11 सदस्य), केलवड (5 प्रभाग 13 सदस्य), पिंपळवाडी (4 प्रभाग 11 सदस्य), पिंपरी लोकाई (3 प्रभाग 7 सदस्य), रामपूरवाडी (4 प्रभाग 11 सदस्य), रांजणगाव खुर्द (5 प्रभाग 13), वाळकी (3 प्रभाग 7 सदस्य), सावळीविहीर खुर्द (4 प्रभाग 11 सदस्य), शिंगवे (4 प्रभाग 11 सदस्य).

या बारा ग्रामपंचायतींसह प्रवरा परिसरातील चंद्रपूर (3 प्रभाग 7 सदस्य), हसनापूर (4 प्रभाग 11 सदस्य), बाभळेश्वर (5 प्रभाग 13 सदस्य), भगवतीपूर (6 प्रभाग 17 सदस्य), कोल्हार बुद्रुक (6 प्रभाग 17 सदस्य), लोणी खुर्द (6 प्रभाग 17 सदस्य), लोणी बुद्रुक (6 प्रभाग 17 सदस्य), ममदापूर पाच प्रभागांत तेरा सदस्य, गोगलगाव (4 प्रभाग 11 सदस्य), हनुमंतगाव (4 प्रभाग 11 सदस्य), नांदूर (4 प्रभाग 11 सदस्य), पाथरे बुद्रुक (4 प्रभाग 11 सदस्य), तिसगाव (3 प्रभाग 9 सदस्य). अशा 13 ग्रामपंचायतीच्या 303 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे.

माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राहाता तालुका बालेकिल्ला मानला जातो. सध्याही बहुतांश ग्रामपंचायती आ.विखे पाटील यांच्याच ताब्यात आहेत. येथून मागे एकाच पक्षात असल्याने आ. विखे पा. व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्रामपंचायत निवडणुकीत सहमती एक्सप्रेस चालत होती.

मात्र राज्यात आघाडी सरकार आल्यानंतर भाजपावासी झालेल्या आ. विखे पा. यांना विरोधी बाकावर बसावे लागले असून विखे-थोरात संबंधही सर्वश्रूत आहेत. तसेच महाविकास आघाडीने ग्रामपंचायत निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असला तरी राहाता तालुक्यात आ.राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात फारसा प्रभाव पडेल असे तरी चित्र दिसत नाही. बहुतांश गावांत त्यांनाच मानणार्‍या स्थानिक दोन गटांत निवडणूक होण्याची शक्यता आहे.

राहाता तालुक्यात पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांचे गाव असलेल्या लोणी बुद्रुकसह त्यांचे पारंपारिक विरोधक असलेल्या जनार्दन घोगरे यांच्या लोणी खुर्द तसेच श्रीरामपूर दूध संघाचे चेअरमन रावसाहेब म्हस्के यांच्या बाभळेश्वर गावांच्या निवडणुका लक्षवेधी होणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com