राहाता तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर

राहाता तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर

राहाता |प्रतिनिधी| Rahata

काल दुपारी पावसाने काहीकाळ दमदार हजेरी लावली. मात्र ग्रामिण भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आलेला नाही. मशागत करून रान तयार केले असले तरी अद्याप शेतकर्‍यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.

मान्सुनची चाहूल लागली असली तरी पावसाची अवकृपा दूर होत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेच वातावरण पसरले आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. समाधानकारक पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकर्‍यांनी बी-बियाणे खत खरेदी केले आहे. मात्र 15 जुन ओलांडून गेला तरी राहाता तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सध्या कृषी सेवा केंद्रावर दिसणारी शेतकर्‍यांची लगबग कमी झाली आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी आगाऊ पैसे भरून शेतीपुरक बी-बियाणे औषधींची खरेदी केली परंतु विक्रीच होत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात लागवडी योग्य क्षेत्र हे 57047 हेक्टर एवढे असुन 39885 हेक्टरवर खरिप पेरणीचे नियोजन आहे. यात सोयाबीन 16500 हेक्टर , मका 18560 , बाजरी 3552 हेक्टर, कपाशी 1511 हेक्टर, चारापिके 8500 हेक्टर यांचा समावेश आहे. कृषी विभागाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी 11899 मेट्रीक टन खतांची मागणी केलेली आहे.

दरम्यान शेतकरी बांधव दमदार पावसाच्या प्रतिक्षेत असून या आठवडयात तरी समाधानकारक पाऊस पडेल आणि पेरणी करता येईल अशी आशा बाळगून आहेत. बाजारपेठेतही तेजी हवी असेल तर वरुणराजाची कृपा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com