
राहाता | वार्ताहर
सायकल आडवी मारल्याचे कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून वीस वर्षीय युवकाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना राहाता शहरातील 15 चारी भागात घडली.
मारहाण सुरू असताना नातवाला वाचविण्यासाठी गेलेल्या आजी आजोबांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. मारहाणीत आजी आजोबा जखमी झाले असून नातु रोहीत याचा मृत्यु झाला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून एक आरोपी अटक केला आहे.
राहाता शहरातील 15 चारी परिसरात इलियास रशीद पठाण यांचे कुटुंब राहते. त्यांचा नातू रोहित ईश्वर वर्मा वय 20 वर्ष घरासमोरील पडवीत बसलेला असताना घरापासून जवळच राहणारे आरोपी अरबाज सय्यद व त्याचा एक अनोळखी साथीदार हातामध्ये चाकू व काठ्या घेऊन आले. सायकल आडवी मारण्याचे कारणावरून रोहित वर्मा यास काठीने मारहाण करू लागले. त्यावेळी आजी अनिसा व आजोबा इलियास भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले.
आरोपी अरबाज सय्यद याने आजी अनिसा व अजोबा इलियास पठाण यांच्या डोक्यात काठीने मारहाण करून त्यांना जखमी केले. रोहित याचा आता मर्डर करून टाकतो असे म्हणत आरोपी रोहितला काठीने मारहाण करू लागले. तेव्हा रोहित त्यांचे तावडीतून पळ काढू लागला असता घरापासून 70 फूट अंतरावर आरोपीनी रोहित वर्मा यास पकडून हातातील चाकूने त्याच्या छातीवर वार करत रोहितचा खून केला.
नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना खबर दिली. रुग्णवाहिकेमधून रोहित वर्मा यास साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ नेले असता तेथील डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.
पोलिसांनी या खून प्रकरणी आरोपी अरबाज सय्यद यास अटक केले असून उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी राहता पोलिसात भादवि कलम 302, 324, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करत आहेत.