राहात्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव प्रशासनाकडून कडक निर्बंध

राहात्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव प्रशासनाकडून कडक निर्बंध

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता तालुका प्रशासनाने करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यामुळे राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी संपूर्ण राहाता तालुक्याला नवीन नियमावली लागु केली आहे.

राहाता तालुक्यात 350 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर बंधने घातली आहेत. यात दैनंदिन गुजरी, भाजीपाला बाजार बंद करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्या ऐवजी लसीकरण केलेल्या विक्रेत्यामार्फत हातगाडी अथवा इतर साधनांद्वारे घरपोच विक्री व्यवस्था करण्यात यावी. जनावरांचा बाजार व आठवडे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तु विक्री दुकाने, हॉटेल, पेट्रोल पंप, गॅस सिलेंडर एजन्सी, इतर अस्थापनामध्ये काम करणार्‍या मालक नोकर यांचे लसीकरण तात्काळ करण्यात यावे. तसेच यांची आरटीपीसीआर अथवा रॅट टेस्ट निगेटिव्ह अहवाल असेल तरच काम करण्याची परवानगी द्यावी. दर 15 दिवसांनी चाचणी करुन घ्यावी. शासकीय कार्यालयात करोनाच्या आरटीआरटीपीसीआर अथवा रॅट टेस्ट निगेटिव्ह अहवाल अथवा दोन्ही डोस पूर्ण झाले असेल तरच त्यांना प्रवेश द्यावा.

धार्मिक स्थळे यांच्या ठिकाणी कार्यरत कर्मचारी यांची चाचणी केलेली असावी, डोस घेतलेले असावे. खाजगी दवाखाने, लॅब, एचआरसीटी केंद्र, मेडिकल स्टोअर यांनी करोना सदृश्य व्यक्ती बाबतची माहिती नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात देणे बंधनकारक आहे. करोना च्या नियमांचे पालन करणांची जबाबदारी नागरिकांची असेल. त्यांनी नियमाचे उल्लंघन केले असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस विभाग, फ्लाईंग स्कॉड यांची राहिल.

कंटेन्मेंट झोन जाहिर झालेल्या ठिकाणी मेडिकल दुकाने, दवाखाने वगळता इतर सर्व अस्थापना बंद असतील. व्यवहार बंद असतील. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी रुग्णसंख्यांचा आढावा घेऊन वैद्यकीय निगडीत व्यवसाय सोडून इतर आस्थापना, व्यवहार याबाबत सकाळी 8 ते दुपारी 4 प्रमाणे वेळ निश्चिती अथवा जनता कर्फ्यू याबाबत निर्णय घ्यावा. असे आदेश तहसिलदार कुंदन हिरे यांनी काढले आहेत. काल राहाता तालुक्यात 87 रुग्ण आढळुन आले आहेत.

ग्रामीण भागात तसेच शहरी भागात अनेकजण मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास येत आहे. दुचाकी स्वार अथवा इतर जण मास्कचा वापर करत नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव अजुनही वाढू शकतो. तालुका प्रशासनाने याबाबत कडक सुचना देण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळा ही सुरु होत आहे. त्यामुळे मोठी काळजी घेणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.