राहाता-साकुरीत दिवसभरात 6 तर तालुक्यात 14 संक्रमित
सार्वमत

राहाता-साकुरीत दिवसभरात 6 तर तालुक्यात 14 संक्रमित

Arvind Arkhade

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता व साकुरीत करोना रूग्णांची संख्या वाढती असल्याने चिंतेचे वातावरण पसरले असून राहात्यात तीन जण तर साकुरीत तीन असे सहा रूग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर राहाता तालुक्यात एकूण 14 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत.

गेल्या आठ दिवसापासून साकुरी व राहाता दोन्ही शहरातील करोना बाधीत रूग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे. नाशिक येथे उपचार घेत असलेल्या राहाता येथील रूग्णाच्या मुलाचा खासगी प्रयोगशाळेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर शहरातील नवनाथनगर येथील दोन महिलांना करोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने त्यांना शिर्डीच्या कोव्हिड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. एका आरोग्य कर्मचार्‍यालाही लोणीला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

साकुरी येथील तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना शिर्डीच्या कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले तर त्यांच्या संपर्कातील इतरांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या परिसरात हे रूग्ण सापडले तो कंटेन्मेंट झोन करण्यात आला असून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

त्याचबरोबर तालुक्यातील लोणी खुर्द गावातील बाधित पोलीस कर्मचार्‍याची पत्नी व मुलगा आणि चंद्रापूर येथील दोघे जण शनिवारी बाधित आढळून आले. जळगाव येथे एक रुग्ण आढळून आल्याने त्या परिसरातील वस्त्या कंटेनमेट झोनमधे टाकल्या आहे. शिर्डीत दोघे, वाकडी गावातील गणेशनगर, जाधव वस्ती परिसर तसेच नांदुर्खी बु. येथेही रूग्ण सापडल्याने ग्रामीण भागातही कडक उपाययोजना राबवत तो परिसर राहात्याचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी कंटेनमेंट क्षेत्र घोषित केले आहे.

करोनाच्या धास्तीने रूग्ण अडमीट करून घेतले जात नाही. यामुळे इतर आजारग्रस्त रूग्णांवर उपचार मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. राहाता ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टरांवर राहाता शहर व शिर्डी नगरपंचायत करोना रूग्णांची जबाबदारी असल्याने व रूग्ण वाढीचे प्रमाण अधिक असल्याने त्यांचीही दमछाक होत असून यामुळे सर्वसामान्य रूग्णांची मोठी पंचाईत होत आहे. प्रशासनाने खासगी दवाखान्यांना रूग्ण दाखल करून उपचार करण्याची सक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com