corona
corona
सार्वमत

राहाता तालुक्यात 23 जण करोना बाधित

101 रिपोर्ट निगेटिव्ह

Arvind Arkhade

राहाता|तालुका प्रतिनिधी|Rahata

राहाता तालुक्यात 23 जण करोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेत वाढ तर 101 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सर्वाधिक 13 करोना बाधित रुग्ण शिर्डीचे असल्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.

राहाता तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत चालल्याने प्रशासनाची मोठी धावपळ होत असून काल रविवारी सकाळी व दुपारी आलेल्या अहवालांत शिर्डीच्या 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर गणेशनगरमधील 3, वाकडी 1, नांदुर्खी 2, जळगाव 1, गोगलगाव 1, राहाता 1 साकुरी 1 असे 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सरकारी व खाजगी लॅबच्या अहवालात 101 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

वाढत्या करोना बाधितांची संख्या ही राहाता तालुक्यातील नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरू पाहत असून पूर्वी शिर्डी, लोणी व राहाता या प्रमुख गावांतच रुग्ण आढळून येत होते. मात्र आता तालुक्याच्या गणेश परिसरात करोनाचा प्रसार होत असून गणेशनगर, वाकडी, जळगाव, नांदुर्खी, साकुरी या गावांतही रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे.

करोना बाधित निघालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या मोठी असून सुदैवाने त्यांची करोना टेस्ट निगेटिव्ह येत असल्याने ही मोठी दिलासादायक बाब समजली जात आहे. राहाता शहरातही आज दोन रुग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्यांना शिर्डीच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांचे घशातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

शिर्डीतील करोना बाधितांची संख्या शतकापार झाल्याने शिर्डीकरांची डोकेदुखी वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com