राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात 3 दिवसांत 260 हुन अधिक रुग्ण करोना पॉझिटीव्ह निघाल्याने सर्व सरकारी कोव्हिड सेंटर फुल्ल झाल्याने नविन रुग्णांच्या चिंतेत भर पडली

असून अनेक रुग्णांना उपचाराअभावी घरी थांबावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने शिर्डीचे कोव्हिड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे,अशी मागणी नागरिक करत आहेत.

गेल्या 15 दिवसांपासून राहाता तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवसांत तालुक्यात 260 जणांना करोनाची बाधा झाली. यामध्ये सोमवारी सर्वाधिक 111 जणांना करोनाची बाधा झाली. मंगळवारी 76 तर बुधवारी 72 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहेत.

यात सर्वाधिक 55 रुग्ण शिर्डीत, लोणीत 47 जण तर राहात्यात 41 रुग्ण सापडले असून त्याचबरोबर पुणतांबा, कोल्हार, वाकडी, सावळविहीर या गावांत देखील रुग्ण वाढत असून तालुक्यातील ग्रामीण भागातही करोना रुग्ण वाढत आहे. पुणतांबा, नपावाडी तसेच लोणी या गावात घरोघरी जाऊन आरोग्य विभाग रुग्णांची तपासणी करत आहे.

सध्या राहाता तालुक्यात 474 रुग्ण अॅक्टीव्ह असून 142 रुग्ण शिर्डी, लोणी व राहाता येथील खाजगी करोना सेंटरमध्ये उपचार घेत असून मोठ्या प्रमाणावर रुग्ण घरीच होमक्वारंटाईन आहेत. यातील रुग्णांचा त्रास वाढल्यास त्यांना उपचारासाठी दाखल करताना मोठी अडचण येत असून सर्व करोना सेंटर फुल्ल असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी नातेवाईक करत आहेत.

शिर्डीचे करोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होत असून यासाठी सरकारी डॉक्टरांबरोबर 20 कंत्राटी वैद्यकीय पथकाला मान्यता दिली आहे गुरूवारपासून शिर्डीचे करोना सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होत असून येथे 300 रुग्णांवर उपचार होऊ शकतील. तसेच शिर्डी व राहाता येथे दोन खासगी करोना सेंटरची मागणी आली असून त्या दोन्ही केंद्रांना लवकरच मंजुरी दिली जाईल, असे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.