राहात्याचा ‘कंट्रोल रूम’ आगीत खाक

1 कोटीच्या नुकसानीचा अंदाज, यांत्रिक उपकरणे जळाली
राहात्याचा ‘कंट्रोल रूम’ आगीत खाक

राहाता |वार्ताहर| Rahata

राहाता तहसील कार्यालयातील महानेट द्वारे तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी कार्यान्वित असलेल्या ऑनलाईन प्रणाली कंट्रोल रूमला रविवारी रात्री विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याने सुमारे 87 लाख रुपयांचे यांत्रिकी उपकरणांचे अंदाजे नुकसान झाल्याचा पंचनामा तहसील कार्यालयाने केला आहे. .शॉर्टसर्किटने शासकीय कार्यालयाचे एवढे मोठे नुकसान होण्याची शहरात पहिलीच घटना आहे.

राहाता तहसील कार्यालयात रात्रीच्या वेळी वॉचमन नसल्याने मध्यरात्री लागलेली आग सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयाचे शिपाई आल्यानंतर समजल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी वॉचमन असता तर दुर्घटना टळली असती. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीचा कारभार ऑनलाईन व्हावा यासाठी महानेट (आयटी) या शासन मान्य कंपनीला ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित करण्याचे कामकाज दिले असल्याने राहाता तहसील कार्यालयात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तहसील कार्यालयातील एकाच रूममध्ये या कंपनीकडून सर्व डिजिटल मशनरीद्वारे ऑनलाईन उपकरणे बसविण्याचे काम सुरू होते.

राहाता तालुक्यातील जवळपास 30 ग्रामपंचायतींसाठी ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले होते व राहिलेल्या 20 ग्रामपंचायतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याने 1 ते 2 महिन्यांत संपूर्ण काम पूर्ण होऊन राहाता तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीचे कामकाज ऑनलाईन सुरू होणार होते. त्यामुळे राहाता येथील तहसील कार्यालयात कंट्रोल रूम मध्ये सुमारे 1 कोटी रुपये किमतीचे साहित्य बसविण्यात आले होते. रविवारी रात्री राहाता शहरात मुसळधार पाऊस झाल्याने ही शॉर्टसर्किट ची घटना घडली असावी असा अनेकांचा अंदाज आहे.

तहसील कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याने नेमकी आग कशामुळे लागली याबाबतचे कारण स्पष्ट झाले नसून या आगीमध्ये राउटर रँक मोठी 2नग रक्कम 15 लाख,एम डी एम एस 1 नाग कपाट एक 4 लाख, केबल बॉक्स एक 1 लाख,बॅटरी 21 नग 5 लाख नेटवर्क राऊटर 2 कॅशिओ कंपनीचे किंमत 60 लाख व किरकोळ छोटे-मोठे वस्तू 2 लाख असे एकूण 87 लाख रुपये किमतीच्या वस्तूचे नुकसान झाल्याचा पंचनामा राहाता येथील तलाठी शिरोळे यांनी केला आहे.

राहता तहसील येथे तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीसाठी महानेट या कंपनीद्वारे ऑनलाइन प्रणाली बसवण्याचे काम सुरू होते. रविवारी रात्री या कंट्रोल रूमला विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून झालेला नुकसानीचा पंचनामा करून संबंधितांना फिर्याद दाखल करण्यास सांगितली आहे. सकाळी 9 वाजता कार्यालयातील शिपाई कार्यालयात आल्यावर त्यांनी आग नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. राहाता नगरपरिषदेच्या अग्निशामक तात्काळ आग विजवण्यासाठी दाखल झाली होती. परंतु तहसील कर्मचार्‍यांनी तोपर्यंंत आग नियंत्रणात आणली होती.

राहाता तहसील येथे तालुक्यातील ग्रामपंचायत साठी कार्यान्वीत असलेल्या कंट्रोल रूमला आग लागून तहसील कार्यालयाने 87 लाखाचा यांत्रिक उपकरणे जळायला चा पंचनामा केला. परंतु महानेट कंपनीच्या कर्मचार्‍यांनी सव्वा कोटी रुपये किमतीचे यांत्रिकी उपकरणाचे आगीत नुकसान झाले असल्याचे सांगितल्याने नेमकी या आगीमुळे किती किमतीचे नुकसान झाले हे चौकशी दरम्यान स्पष्ट होईल.

राहाता तालुक्यातील 50 ग्रामपंचायतींसाठी महानेट या कंपनीद्वारे ऑनलाईन प्रणाली बसवण्याचे काम सुरू होते.रविवारी रात्री कंट्रोल रूमला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झालेल्या नुकसानीची फिर्याद दाखल करण्यास संबंधितांना सांगितले असून चौकशी दरम्यान आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होईल. तहसील कार्यालयाचे दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू व्हावे यासाठी तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

- कुंदन हिरे (तहसीलदार, राहाता)

ग्रामपंचायतींसाठी नेट पुरवठा करणार्‍या कंट्रोल रूमला आग लागून ऑनलाईन प्रणालीच्या उपकरणांचे नुकसान झाले. मात्र यामुळे ग्रामपंचायत कामकाजात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही.

- समर्थ शेवाळे, गट विकास अधिकारी राहाता

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com