राहात्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; जनजीवन विस्कळीत

शेती पिकांची व घरांचे मोठे नुकसान, वाहतूक अनेक तास ठप्प
राहात्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; जनजीवन विस्कळीत

राहाता |वार्ताहर| Rahata

शहरात बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन 6 तास सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राहाता शहरात बहुतांश भागातील रस्त्यांवरील वाहतूक पावसाच्या पाण्यामुळे बंद करण्यात आली होती. तसेच अनेक घरात व शेती पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये पाणी घुसल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. सलग 18 तास वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. शहरात 1965 नंतर प्रथमच अशी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितले.

राहाता शहरात बुधवारी रात्री 2 वाजेपासून सकाळी 7 वाजेपर्यंत विजेच्या कडकडाटासह शहरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे राहाता परिसरातील चितळी रोडलगत असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या जवळपास बहुतांशी घरात पावसाचे पाणी जाऊन नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री विजेचा कडकडाट व मुसळधार पावसामुळे येथील महावितरण सबस्टेशनमध्ये पाणी गेल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक नागरिकांनी रात्र जागून काढली. परंतु महावितरणच्या अधिकार्‍यांनी सबस्टेशनमध्ये पाणी असतानाही नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरिता अस्तगाव सबस्टेशन येथून वीज पुरवठा जोडून राहाता व परिसरात वीज पुरवठा तात्काळ देण्याचे उपाययोजना केल्यामुळे नागरिकांनी अधिकार्‍यांचे कौतुक केले.

आडगाव, केलवड, खडकेवाके, पिंपळस, नांदुर्खी, दहेगाव, साकुरी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्या गावातील पावसाचे पाणी राहाता शहरात येणार्‍या विविध नाल्यात आल्याने राहाता-साकुरी कात नाल्यावरील पूल, प्रीतीसुधाजी इंग्लिश मीडियम स्कूल जवळील नगर -मनमाड रोड, 15 चारी येथील सोनवणे फॉर्म रस्ता, राहाता शिर्डी शिरखंडे ओढ्याजवळील नगर-मनमाड महामार्ग रस्ता, राहाता नगरपरिषद पाठीमागील दशक्रिया विधी घाटाकडे जाणारा रस्ता असे शहरातील अनेक रस्ते दिवसभर वाहतुकीसाठी बंद झाले होते. त्यामुळे या रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना पर्याय मार्ग शोधावा लागला.

शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांचे शेतातील काढणीस आलेली सोयाबीन वाहून गेली. तसेच घास, मक्का, याबरोबरच पेरू, चिकू, ऊस, द्राक्ष, डाळिंब, आंबा व इतर फळ बागेत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रामुख्याने काढणीस आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.

राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात अतिवृष्टीमुळे पुन्हा पाणी गेल्यामुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरातील बाजारतळ येथील मटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. राहाता जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी शहरामध्ये झालेल्या पावसाची 95 मि.मि नोंद झाली आहे. परंतु त्या जवळ असलेल्या शेतकर्‍यांनी बसवलेल्या खाजगी जलमापक यंत्रामध्ये जवळपास 145 मि.मी पावसाची नोंद दाखवली. अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ पाणी करून पंचनामे करावे व शासकीय शासनाने तात्काळ शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकरी, व्यावसायिक तसेच घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे सूचना महसूल खात्याला केल्या तसेच ज्या भागात अतिवृष्टीमुळे रस्ते वाहतूक करण्याकरिता बंद झाले त्या ठिकाणी तात्काळ पर्यायी व्यवस्था करून रस्ते सुरू करण्याची सूचना केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com