अचानक विद्युत वाहक दोन तारा तुटल्याने राहात्यात नागरिकांची धांदल

तरुणांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
अचानक विद्युत वाहक दोन तारा तुटल्याने राहात्यात नागरिकांची धांदल

राहाता (वार्ताहर)

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी दुपारी विद्युत वाहक दोन तारा अचानक रोडवर पडल्याने नागरिकांची मोठी धांदल उडाली. शहरातील युवकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गुरुवार दि. १६ जून रोजी दुपारच्या वेळी शहराचा आठवडे बाजार . असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक असलेल्या चितळी रोडवर नागरिकांची मोठी रेलचेल सुरू होती. शाळा सुटण्याची वेळ असल्यामुळे या रस्त्यावरून स्कूल बसेस व विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असतानाच चितळी रोड लगत असलेल्या सुरज एम्पोरियम व आनंद क्वॉलिटी किराणा दुकान जवळील लिंबाच्या झाडाजवळून आगीचे लोळ अचानक सुरू झाले व काही क्षणातच या रोडवरून जाणाऱ्या विद्युत वाहक दोन तारा अचानक तुटून रोडवर पडत असताना या रोडवरून जाणाऱ्या नागरिकांची मोठी धांदल उडाली.

या ठिकाणी रोडलगत असलेल्या मोहीत निकाळे या तरुणाच्या पानटपरीवर विद्युत वाहक तारा पडत त्याने बघितले. त्याने असताना त्याने समयसूचकता दाखवत टपरीतून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या रोडलगत उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते राहूल सदाफळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ वीज महावितरण कंपनीचे अभियंता बच्छाव यांना फोन करून वीजपुरवठा खंडित करण्याबाबत सांगितले.

आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे व वीज वाहून नेणाऱ्या दोन तारा अचानक तुटल्यामुळे रोडवरून जाणाऱ्या नागरिकांची मोठी धावपळ उडाली. नागरिकांची होणारी धावपळ पाहून रोडवरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना काय झाले हे काही कळालेच नाही. नागरिकांची होणारी धावपळ पाहून राहुल सदाफळ, बाळासाहेब सदाफळ, सदाफळ, बाळासाहेब आबाडे, जालिंदर आरणे, राजेंद्र भातोडे, स्वप्निल लोढा, भीमराज निकाळे, प्रतिक काकडे, नईम तांबोळी आदी युवकांनी तात्काळ रस्त्यावर फळांचे रिकामे कॅरेट लावून वाहतूक बंद केली.

तारा तुटल्या त्यानंतर काही वेळातच दोन विद्यालयाच्या स्कूल बसेस विद्यार्थ्यांना घरी सोडण्याकरिता जात होत्या. नागरिकांनी तात्काळ त्या बस चौकात थांबवून पर्यायी मार्गाने काढून दिल्या. गुरुवारी शहराचा आठवडे बाजार असल्यामुळे याठिकाणी दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला,

सुरज एम्पोरियम या कापड दुकानाचे संचालक स्वप्निल लोढा यांनी त्यांच्या दुकानाजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडाव्यात असे महावितरण कंपनीच्या वायरमनला सांगितले होते. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळेच या झाडांच्या फांद्यांना विद्युत वाहक तारा घासून तुटल्या. जर फांद्या आधीच तोडल्या असत्या तर कदाचित या तारा तुटल्या नसत्या असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक शहरात दिवसभर नागरिकांकडून केले जात होते.

राहाता शहर व परिसरात विद्युत वाहक तारा अनेक वर्षांपासून जुन्या असल्यामुळे जीर्ण होत चालल्या आहेत. परिणामी ज्या ठिकाणी तारा झाडाजवळून जातात त्याठिकाणी त्या घासून अनेकदा तारा जमिनीवर पडतात. परिणामी त्याठिकाणी असलेल्या नागरिकांची अचानक धावपळ होते. महावितरण कंपनीने तात्काळ शहर व परिसरातील जीर्ण झालेल्या विद्युतवाहक तारा व वाकलेले पोल दुरुस्त करावेत व तारांजवळ असलेल्या झाडांच्या फांद्या कापून नागरिकांना विद्युत वाहक तारांपासून धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी.

- राहुल सदाफळ, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com