
राहाता |वार्ताहर| Rahata
राहाता - साकुरी पुलावरून अज्ञात दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण चोरून नेल्याची घटना सोमवारी दिनांक 6 जून रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान राहाता शहरात घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रतिभा वासुदेव चाळसे यांनी राहाता पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे मी साकुरी येथील पिपाडा मोटर्स या ठिकाणी नोकरीस आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे माझे कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर घरी जाण्यासाठी पायी नगरच्या दिशेने राहत्याकडे जात असताना राहाता -साकुरी या पुलावर दोघे व्यक्ती डोक्यामध्ये टोपी व तोंडाला रुमाल बांधलेले मोटरसायकलीवर उभे होते. मी त्यांच्या मोटारसायकल जवळून जात असताना गाडीवर बसलेल्या पाठीमागच्या व्यक्तीने माझ्या गळ्यातील दोन तोळे वजनाच्या सोन्याचे मनीगंठणला हिसका मारला मनीगंठण चोरणार्या व्यक्तीस प्रतिकार करण्याचा प्रयत्न करून माझ्या गळ्यात असलेल्या मनीगंठला हातात पक्का धरून ठेवल्याने माझ्या हातात अर्धा तोळ्याची चैन राहिली.
सुमारे दीड तोळ्याचे मिनी गंठण चोरट्यांनी चोरून नेले. मिनीगंठण चोरतांना माझ्या गळ्याला जोराचा हिसका बसल्याने माझ्या गळ्याला जखम झाली आहे. मी 8 वर्षांपूर्वी केलेल्या मिनीगंठण वापरत असून चोरी झालेल्या मिनी गंठणची अंदाजे किंमत 60 हजार असल्याची माहिती तक्रारदार महिलेने पोलिसांत दिली आहे. गंठण चोरी प्रकरणी प्रतीभा चाळसे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहे. शहरात किंवा परिसरात अनोळखी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांची संपर्क साधावा महिलांनी पायी जाताना मौल्यवान दागिने घालण्यास टाळावे असे आव्हान पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.