राहाता तालुक्यातील सर्व महसुल मंडळावंर बागायतीचा पगडा

राहाता तालुक्यातील सर्व महसुल मंडळावंर बागायतीचा पगडा

पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal

राहाता तालुक्यात पाच महसुल मंडळे असून सर्वच मंडळांचे मुख्यालय बागायती गावांमध्ये आहे. तसेच सर्वच मंडळात बहुतांश बागायती तर दोन-तीन जिरायती गावे जोडली आहेत. त्यामुळे टंचाई, दुष्काळ, पिक विमे, शासकीय सवलती, अटल भुजल योजना सारख्या योजनांपासून जिरायती गावे वंचित राहत आहेत.

तालुक्यातील साठ गावे बाभळेश्वर, लोणी, राहाता, शिर्डी, पुणतांबा या पाच महसुल मंडळांत विभागले आहे. एका महसुल मंडळात साधारणतः बारा गावांचा समावेश आहे. मंडळ कार्यालयातून गावाचा महसुली कारभार हाकला जातो. सर्व मुख्यालये प्रवरा व गोदावरीच्या बागायत पट्ट्यातील आहेत. तालुक्यात निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील पिंपरी निर्मळ, आडगाव खु, आडगाव ब्रु, खडकेवाके, केलवड, कोर्‍हाळे, वाळकी, डोर्‍हाळे, गोगलगाव, पिंपरी लोकाई, दहेगाव अशा जिरायती गावाचाही समावेश आहे.

मात्र या दुष्काळी व जिरायती गावांची भौगोलिक सलगता व नैसर्गिक परिस्थिती समान असूनही एकाच महसुली मंडळात न घेता तिन महसूल मंडळात विभागले आहेत. पिंपरी निर्मळ बाभळेश्वर मंडळात, आडगाव खुर्द, आडगाव बु, गोगलगाव, पिंपरी लोकाई लोणी मंडळात तर केलवड खु, केलवड बु, खडकेवाके, कोर्‍हाळे, डोर्‍हाळे, वाळकी ही जिरायत गावे राहाता महसूल मंडळात समाविष्ट करण्यात आली आहेत.

पिक विम्याचे परतावे देताना मंडल नियाह पिक कापणी प्रयोग होतो. हा प्रयोग बागायती गावात झाल्यास सरासरी उत्पन्न जास्त येते व पिक विमा मिळत नाही. तसेच दुष्काळ टंचाई पडल्यास शासनाकडून वेळोवेळी आर्थिक, शैक्षणिक व शेतीविषयी सवलती जाहीर होतात. मात्र महसूल मंडळात एक दोन गावे जिरायत व आठ-दहा गावे बागायत यामुळे या सवलती मिळण्यास अडचणी येतात. केंद्र सरकारने गेल्या वर्षी शोषीत व टंचाईग्रस्त गावातील भुजल उपलब्धता वाढविण्यासाठी अटल भुजल योजना सुरू केली.

या योजनेतून राज्याला जवळपास 925.77 कोटीचा निधी मिळणार आहे. राहाता तालुक्यातील योजनेत समाविष्ठ नऊ गावांपैकी गोगलगाव वगळता यामध्ये एकाही जिरायती गावाचा समावेश झालेला नाही. तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील जिरायती गावामध्ये नैसर्गिक समानतेबरोबर भौगोलिक सलगताही असल्याने प्रशासनाने या जिरायती व दुष्काळी गावांचे स्वतंत्र महसुल मंडळ केल्यास शासनाकडुन वेळोवेळी परिस्थिती अनुरूप देण्यात येणार्‍या योजनांचा लाभ या भागातील पात्र शेतकर्‍यांना मिळेल, अशी आशा जिरायत भागातील शेतकर्‍यांमधुन व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com