
राहाता |वार्ताहर| Rahata
यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गुरुवारी राहात्यात बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट दिसून आले. तसेच यांत्रिकी युगामुळे बैलांची संख्या घटली आहे.
गुरुवारी सायंकाळी वीरभद्र मंदिरासमोर शेतकरी बांधवांनी आपली बैलजोडी आणून पोळा सण साजरा केला. बैलांची सजावट करून बँड पथकाच्या तसेच ढोल ताशाचा गजर करत बैलांची मिरवणूक काढली. अनेकांनी बैल तसेच गायीच्या सजावटीसाठी दुष्काळ परिस्थितीमुळे सजावटीचे साहित्य खरेदीसाठी उत्साह दाखविला नाही. त्यामुळे व्यापारी पेठेत देखील यावर्षी शुकशुकाट दिसून आला. परिणामी गुरुवारी अवघ्या सात ते आठ बैल जोड्या वीरभद्र मंदिरासमोर आल्या होत्या. वीरभद्र ट्रस्ट त्यांच्याकडे असलेल्या गाय व बैलांची उत्कृष्ट सजावट केली होती. येथील शेतकरी शिवाजी आनप व वाघमारे बंधूंनी बैलांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. या दोन मिरवणुका आकर्षण ठरले. सायंकाळी वीरभद्र देवतांची आरती झाल्यानंतर बैलाची मिरवणूक काढून वेशीमध्ये आणून सोडले. त्यानंतर शेतकरी बांधवांनी वाजत गाजत बैलं आपल्या घरी नेले.
वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, उपाध्यक्ष सचिन बोठे, सागर सदाफळ, प्रवीण सदाफळ, निवृत्ती बनकर ,चांगदेव गिधाड, विजय सदाफळ, सेक्रेटरी अरविंद गाडेकर, तसेच डॉ. स्वाधिन गाडेकर, डॉ. महेश गव्हाणे, संतोष बोरकर, प्रवीण बोरकर, सागर भुजबळ, चंद्रशेखर कार्ले, मिलिंद बनकर यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या कुटुंबात पिढीजात बैलजोडी सांभाळण्याची परंपरा आहे. बैल जोडी सांभाळण्यासाठी स्वतंत्र एका व्यक्तीची गरज लागते. जनावरांचे खाद्य, चारा अत्यंत महाग झाल्याने बैल जोडी सांभाळण्यासाठी मोठा खर्च लागतो. शेती मशागत जलदगतीने व्हावी यासाठी अनेक जण यांत्रिकी पद्धतीचा वापर करतात. परंतु पेरणीसाठी बैलजोडीची पसंती असल्यामुळे बैलजोडी सांभाळण्याची परंपरा आम्ही कायम ठेवली आहे.
- शिवाजी आनप, शेतकरी