
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
शासनाच्या धोरणाप्रमाणे राहाता तालुक्यात पाच महसूल मंडळे आहेत.ह्याच पाच गावांत पर्जन्यमापक बसवलेली असून यावर होणारा पाऊस तालुक्यातील सर्व गावांना बंधनकारक केला जातो. मात्र बर्याच गावांत अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या प्रलंबित आहेत. मात्र महसूल मंडळातील या पाच गावांमधील पावसाची गेल्या दोन महिन्यांतील सरासरी 75 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. मध्यंतरी पाऊस काही भागातच पडला. नेमके तेथेच पर्जन्यमापक असल्याने पावसाची आकडेवारी फुगली मात्र उर्वरित बहुतांश गावे कोरडीठाक राहिली. या अर्धवट यंत्रणेचा शेतकर्यांना मात्र फटका बसत असल्याचे चित्र आहे.
मान्सूनच्या पावसाला सुरुवात होऊन जवळपास दोन महिने उलटून गेले तरीही राहाता तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. अनेक गावांत तर पेरणीलायक सुद्धा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पिंपरी निर्मळ परिसरासह अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात खरिपाच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. या भागावर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. तालुक्यातील पावसाचे मोजमाप करण्यासाठी राहाता, शिर्डी, पुणतांबा, बाभळेश्वर, लोणी या पाच गावांमध्ये पर्जन्यमापक बसवलेले आहेत. या पाच गावांत झालेल्या पावसाची नोंद घेऊन त्याची सरासरी काढली जाते व तालुक्यातील सर्व 60 गावांना ती लागू केली जाते. चालू वर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र अपघाताने महसूल मंडळात लावलेल्या या गावांवरच एक दोनदा बर्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे तालुक्यातील दोन महिन्यांच्या पावसाची सरासरी 75 टक्क्यांच्या पुढे निघून गेली.
तालुक्यात जून-जुलै या दोन महिन्यादरम्यान 183 मिमी सरासरी पाऊस होतो. चालू वर्षी दोन महिन्यांत 135 मिमी म्हणजेच सरासरीच्या 73 टक्के पाऊस झाला आहे. त्यामध्ये पुणतांबा गावावर 163 मिमी पाऊस झाला. मात्र आजुबाजुच्या गावांवर हा पाऊस झाला नाही. पुणतांबा मंडळात तर दुबार पेरणीचे संकट सध्या उभे आहे. अशीच अवस्था राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर मंडळात झाली. मात्र या चार गावांतच पडलेल्या पावसाने तालुक्यातील 60 गावांची सरासरी पावसाची आकडेवारी वाढवली. बाभळेश्वर गावावर पाऊस कमी झाल्याने या मंडळाची आकडेवारी 50 टक्क्यांवरच राहिली.
सध्या पाऊस लहरी झाला आहे. दर अर्धा किलोमीटरला पावसाचे प्रमाण बदलत आहे. त्यामुळे 60 गावांचा पाऊस मोजण्यासाठी केवळ 5 गावांत पर्जन्य मापकाची व्यवस्था करणे व त्याद्वारे तालुक्यातील 60 गावांच्या पावसाची सरासरी काढणे चुकीचे ठरत आहे. कमी पावसामुळे अनेक भागात अद्याप मोठ्या प्रमाणात पेरण्याही रखडलेल्या आहेत. मात्र शासनाचे पर्जन्यमापक सर्वत्र ऑल इज वेल असल्याचे दाखवत असल्याने शेतकर्यांवर मोठा अन्याय होत आहे. या चुकीच्या पर्जन्यमापक पद्धतीमुळे येत्या काळात पाऊस आणखी लांबल्यास व शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना टंचाई अनुदान पीक विम्याचे परतावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, पीक कर्जाचे पुनर्गठण, शेती वीज बीलात सवलती अशा अनेक लोकाभिमुख सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. शासनाने यामध्ये बदल करून पर्जन्यमापकासाठी गावनिहाय योग्य अशी प्रणाली उभी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
तालुक्यातील बाभळेश्वर मंडळात अवघा 50 टक्के पाऊस आहे. मंडळातील पिंपरी निर्मळ मध्ये तर चांगल्या पावसाअभावी जवळपास 30 टक्के पेरण्या बाकी आहेत. कमी ओलीवर ज्यांनी पेरले त्याच्यापुढेही कमी उतार झाल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जवळपास अशीच परिस्थिती तालुक्यातील बहुतांश गावाची असल्याने चालू वर्षीचा खरीप हंगाम संकटात असल्याचे चित्र दिसून येत आहे.