तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला शिर्डीतून 1 लाखाची मदत

तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांच्या फडाला शिर्डीतून 1 लाखाची मदत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

गेल्या एक वर्षापासून करोनाच्या काळात तमाशा कलावंतांना उपासमारीची वेळ आली असून साईबाबांच्या शिर्डी गावातून तमाशा कलावंत जगला पाहिजे म्हणून शिर्डीमध्ये गेल्या 75 वर्षापासून रामनवमीची परंपरा जपणारे रघुवीर खेडकर यांच्या तमाशा फडातील कलावंत व कामगारांना मदत म्हणून 1 लाख रुपये रोख स्वरुपात देण्यात आले. याप्रसंगी ही मदत नसून साईबाबांचा प्रसाद असल्याचे रघुवीर खेडकर यांनी सांगितले.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील लोककला सादर करणार्‍या कलावंतावर आज उपासमारीची वेळ आली आहे. श्री साईबाबा हयात असताना स्वतः कलावंताची कदर करायचे व मानधन द्यायचे. श्रीरामनवमी यात्रा करोनामुळे यंदाही रद्द झाली आहे. त्यामुळे श्रीरामनवमी यात्रा कमेटीचे अध्यक्ष केशव आण्णा गायके यांच्या वस्तीवर छोटीशी बैठक झाली. यामध्ये तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांनी रामनवमी उत्सवात गेल्या चार पाच वर्षापासून कधीही मानधनाबाबत रक्कम ठरवली नसून जे द्याल तो बाबांचा प्रसाद समजुन स्विकारील अशी भुमिका घेणारे तसेच निस्सिम साईभक्त असल्याने नुकत्याच एका मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची व्यथा व हाल अपेष्टा ऐकल्याने सर्वांच्या सहमतीने निर्णय घेण्यात आला.

रामनवमी यात्रेतील मागिल 2 वर्षापूर्वीची शिल्लक रकमेतून 1 लाख रुपये देण्याचे ठरले.त्याप्रमाणे रविवारी सायंकाळी 6 वाजता साईबाबांच्या मंदिरालगत गेट नंबर चार जवळील कळसासमोर ही मदत देण्यात आली. यावेळी रघुवीर खेडकर यांनी ही रक्कम नसून श्री साईबाबांचा प्रसाद आहे, आमचे 130 लोकांचे कुटूंबाला मोठा हातभार मिळाला, असे बोलताना भावनिक होवुन त्यांचे डोळे भरुन आले आणी साईबाबांच्या कळसासमोर नतमस्तक झाले.

याप्रसंगी करोनामुळे नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात फक्त यात्रा कमेटीचे अध्यक्ष केशव आण्णा गायके, शिवसेना नेते कमलाकर कोते, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते, जेष्ठ नगरसेवक अभय शेळके, नगरसेवक सुजित गोंदकर, खजिनदार बाळासाहेब लुटे व प्रमोद गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com