फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता मोर्चा स्थगित करावा - ना. विखे

फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता मोर्चा स्थगित करावा - ना. विखे

लोणी |प्रतिनिधी| Loni

किसान सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींशी प्रदीर्घ चर्चा केली आहे. हे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. फार प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हा मोर्चा स्थगित करावा, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

अकोले येथून विविध मागण्यांकरिता किसान सभेच्या माध्यमातून लोणी येथे येणार्‍या मोर्चा संदर्भात माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, शेतकर्‍यांना आपल्या मागण्यांसाठी मोर्चा काढण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च शेतकर्‍यांनी काढला होता. त्याचवेळी त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्तरावर चर्चा होवून हे प्रश्न सोडविण्याबाबत त्यांना आश्वासित केले आहे.

अकोले येथून निघणार्‍या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आपण मंगळवारी मुंबई येथे शेतकरी प्रतिनिधीं समवेत साडेचार तास बैठक करुन प्रत्येक मुद्यावर चर्चा केली आहे, त्यांच्या शंकाचे निरसन केले आहे. महसूल विभागासंदर्भात असलेल्या त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनास काही आदेशही दिले आहेत. वनजमिनींवरील अतिक्रमण काढण्याला स्थगितीही दिली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

आता उर्वरित मागण्यांबाबत असलेल्या कायद्याच्या अडचणी दूर करण्यासाठी थोडा कालावधी द्यावा लागेल. शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. परंतू आजच सर्व मागण्या मान्य कराव्यात असा आग्रह धरणेही योग्य नाही. इतर विभागाच्या संदर्भात असलेल्या मागण्यांबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करावी लागले. आज सर्वच तालुक्यांमध्ये बाजार समित्यांच्या निवडणुका सुरु आहेत.

त्या विभागाचे मंत्री सुध्दा निवडणूक प्रक्रियेत आहेत. त्यामुळे पुन्हा 3 मे रोजी या प्रश्नाबाबत चर्चा करण्याबाबत आपण या शेतकरी प्रतिनिधींशी बोलणी केली आहे. सरकारने हा विषय कुठेही प्रतिष्ठेचा केलेला नाही. आंदोलनकर्त्यांनी सुध्दा फार प्रतिष्ठेचा न करता सरकारची विनंती मान्य करावी.

वाढता उष्मा तसेच पावसाचीही वर्तविलेली शक्यता लक्षात घेवून शेतकर्‍यांचे हाल होवू नयेत हीच आमची या पाठीमागील भूमिका आहे. तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारने चर्चेची दारे खुली ठेवली आहेत, असेही ना. विखे पाटील यांनी शेवटी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com