मुंबईपुरतेच निर्णय करून राज्याला वार्‍यावर सोडले -  राधाकृष्ण विखे पाटील

मुंबईपुरतेच निर्णय करून राज्याला वार्‍यावर सोडले - राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील कोविड योद्ध्यांचा सन्मान

शिर्डी (प्रतिनिधी) - ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी केवळ मुंबई पुरतेच निर्णय करून ग्रामीण महाराष्ट्राला वार्‍यावर सोडून दिले. फक्त केंद्र सरकारकडून मदतीच्या अपेक्षा करायच्या मग तुम्ही काय करणार? असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

शिर्डी विधानसभा मतदार संघात कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देणार्‍या सरकारी वैद्यकीय अधिकारी, खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांसह रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार, आशा सेविका आणि नर्सिंग स्टाफचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने प्रातिनिधीक स्वरुपात हा कृतज्ञता कार्यक्रम संपन्न झाला. सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजपाचे कार्यकर्ते कोविड योद्ध्यांना घरी जाऊन सन्मानित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 7 वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्यावतीने सेवा ही संघटन या उपक्रमातून गाव पातळीवर आरोग्य सेवांचे उपक्रम तसेच कोविड योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. शिर्डी विधानसभा मतदार संघातील आरोग्य, महसूल तसेच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका या आशा एकूण 1500 हून अधिक करोना योद्ध्यांना सन्मानित आले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, प्रतापराव जगताप, कैलास कोते, अभय शेळके, नितीन कोते, अशोक गायके, सुजित गोंदकर, रवि कोते, स्वानंद रासने, भाजयुमोचे सतीश बावके व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपअधीक्षक संजय सातव, शिर्डी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. मैथीली पितांबरे यांच्यासह इतरही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

राहाता येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात सर्व कोविड योद्ध्यांना सन्मानित केल्यानंतर आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले.

महाराष्ट्र राज्य हे ऑक्सीजन निर्मितीत अग्रेसर मानले जाते तरीही ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारवरच अवलंबून राहणारे आघाडी सरकार कोविड संकट रोखण्यात अपयशी ठरले. या संकटात आघाडी सरकार ना सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहिले ना कोणती मदत यांनी मिळवून दिली. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून यांनी जे निर्णय घेतले त्याचा कोणताही लाभ ग्रामीण महाराष्ट्राला होणार नाही. त्यामुळेच आघाडी सरकार हे फक्त घोषणा करत राहिले.

मानवतेच्या दृष्टीकोनातून सरकारी यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी कोविड संकटात केलेल्या निरपेक्ष कामामुळेच सामान्य माणसाला आधार वाटल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

राहाता येथील कार्यक्रमास गणेश कारखान्याचे चेअरमन मुकूंदराव सदाफळ, भाजपाचे उपाध्यक्ष रघुनाथ बोठे, डॉ. कैलास गाडेकर, डॉ.राजेंद्र पिपाडा, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, जि. प. सदस्या कविता लहारे, बार असोशिएशनचे अध्यक्ष तेजस सदाफळ, अ‍ॅड. ऋषिकेश खर्डे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.