
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
डिसेंबर संपला असून आता जानेवारी सुरू झाला आहे. मात्र, मुबलक पावसानंतर जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या संथगतीने सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 97 हजार 147 हेक्टरवर (71.77 टक्केच) पेरण्या झालेल्या आहेत. विशेष म्हणजे जादाच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरणीचे क्षेत्र जवळपास 50 टक्क्यांनी कमी झालेले असताना दुसरीकडे गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र वाढलेले नाही. कृषी विभागाच्या नियोजनापेक्षा या दोन्ही पिकांची पेरणी कमी झालेली आहे.
नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलिकडच्या काळात जिल्ह्यात खरीप हंगामातील कपाशी आणि सोयाबिनचे क्षेत्र वाढत आहे. यंदा मात्र सततच्या आणि जादाच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्या आहेत. विशेष करून रब्बीचे क्षेत्र अर्ध्यावर आलेले आहे. कमी झालेल्या क्षेत्रावर गहू आणि हरभरा पिकांचा पेरा वाढेल अशी अपेक्षा कृषी विभागाला होती.
मात्र, तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यात गहू पिकांची पेरणी 86 हजार 212 हेक्टरवर झालेली असून त्याची टक्केवारी ही 99.78 टक्के आहे. दुसरीकडे हरभरा पिकाची पेरणी 93. 66 टक्के झालेली असून मका पिकाचे क्षेत्र 125 टक्के झालेले आहे.
जिल्ह्यात नवीन ऊसाची लागवड जोमात आहे. आतापर्यंत 70 हजार 264 हेक्टरवर लागवड झालेली असून त्यात आणखी मोठी वाढ होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे पुढील हंगामात ऊसाची कमरता भासणार नाही. यंदा कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 5 लाख 53 हजार क्षेत्र ऊस लागवडीसह गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ऊस लागवडी शिवाय 3 लाख 26 हजार 883 हेक्टरवर आणि ऊस लागवडीसह 3 लाख 97 हजार क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत.
पिकनिहाय पेरण्या कंसात टक्केवारी
ज्वारी 1 लाख 39 हजार 906 (52 टक्के), गहू 86 हजार 212 (99 टक्के), मका 17 हजार 739 (125.65 टक्के), हरभरा 82 हजार 777 (99.66 टक्के), सुर्यफूल 35 (9.7) आणि उस लागवड 70 हजार 264 (74.2) यासह अन्य पिकांच्या लागवडी झालेल्या आहेत.
तालुकानिहाय पेरण्या (ऊस लागवडीसह)
नगर 43 हजार 885 (80.8), पारनेर 53 हजार 826 (77.3), श्रीगोंदा 40 हजार 492 (60.29 टक्के), कर्जत 45 हजार 629 (60.94 टक्के), जामखेड 43 हजार 91 (95.38), शेवगाव 9 हजार 66 (27.59 टक्के), पाथर्डी 37 हजार 442 (97.1 टक्के), नेवासा 16 हजार 672 (37.44 टक्के), राहुरी 17 हजार 344 (49.35 टक्के), संगमनेर 11 हजार 366 (49.35), अकोले 10 हजार 271 (122.77 टक्के), कोपरगाव 22 हजार 312 (91.2 टक्के), श्रीरामपूर 20 हजार 900 (101.71 टक्के) आणि राहाता 24 हजार 849 (100 टक्के).