गोदावरी कालव्याचे आवर्तन लांबल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात

File Photo
File Photo

राहाता (तालुका प्रतिनिधी)

गोदावरी कालव्याच्या आवर्तना अभावी लाभक्षेत्रातील हातातोंडाशी आलेली गहु, हरभरा, कांदा यासारखी पिके आवर्तना अभावी धोक्यात आलेली आहेत.

यावर्षी समाधानकारक पाऊस झाला आणि धरणेही शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे रब्बीचे पिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या वाढत्या तीव्र तापमानामुळे जमीनीतील पाण्याची पातळी घसरली असून विहीर तसेच बोअरवेल कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. विजेचा लपंडाव चालु असल्याने जे काही थोडेफार पाणी आहे तेही देता येत नाही. एका पाण्याअभावी रब्बी पिक हातचे जाईल अशी परिस्थिती आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे लाभक्षेत्रातील परिस्थिती भीषण असूनही याबाबत जलसंपदा अधिकारी संवेदनशुन्य आहेत. सध्या सिंचन व्यवस्थापनाच्या मुलभूत परंतु साध्या साध्या किरकोळ किरकोळ विषयासाठी सातत्याने जो संघर्ष करावा लागतोय, रस्त्यावर यायची वेळ येते, उपोषणास बसावे लागते ही दुर्दैवाची बाब आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक लाभक्षेत्राबाहेर झाल्याने त्या नियोजनात त्यांना सहभाग घेता आला नाही. कालवा सल्लागार बैठकीत ठरलेल्या नियोजनाप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही. दोन आवर्तनात जादा अंतर पडल्याने पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. यापुर्वीचे आवर्तन होऊन दोन महिने होत आले आहेत परंतु अद्यापही आवर्तन सोडण्याबाबत अधिकृतपणे माहिती लाभधारकांना दिली जात नाही. मागणी कमी येण्याचे खरे कारण या अनिश्चिततेमध्येच दडलेले आहे. जलसंपदा विभागाच्या धरसोडपणामुळे त्यांनी विश्वासार्हता गमावली आहे.

वृत्तपत्राद्वारे वा निवेदनाद्वारे ही गाऱ्हाणी मांडली जातात. परंतु त्याची गांभीर्याने दखल घेऊन लाभधारकांबरोबर संवाद साधून त्याबाबतची वस्तुस्थिती सांगावी, असे कुणालाच वाटत नाही. त्यामुळे प्रशासन बेफिकीर होत निर्ढावले गेले आहे. सोशल मिडीयावर आज पाणी सुटणार उद्या पाणी सुटणार म्हणून लाभधारकांची दिशाभूल करण्यात येऊन त्यांना आशेला लावले जात आहे. सद्यस्थितीत गोदावरी कालवा कल्व्हर्टची कामे चालू असल्याने मार्चच्या आठ नऊ तारखेपर्यंत कालव्यात पाणी येण्याची सुतराम शक्यता नाही, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक दोन आवर्तनातील तीन आठवड्याच्या बंद काळात ही कामे दोन शिफ्टमध्ये युध्दपातळीवर करण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करणे गरजेचे होते जेणेकरून आवर्तन वेळेत सोडता आले असते. परंतु ठेकेदाराची असमर्थता आणि जलसंपदाची उदासीनता यामुळे तसे झाले नाही आणि ऐन गरजेच्या वेळी आवर्तन मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

अस्मानी आणि सुलतानीच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे . जलसंपदा विभागाने क्षेत्रीय परिस्थितीचा गांभीर्याने विचार करुन आवर्तन सोडणेची कार्यवाही करावी, अशी मागणी लाभधारकांकडुन होत आहे.

गोदावरी कालव्याच्या कल्व्हर्टचे काम करताना अचुक पुर्व नियोजन आवश्यक आहे. पिकांना वेळेत पाणी मिळेल अशा पध्दतीने दोन आवर्तनाच्या बंद कालावधीत ही कामे सुरु करुन पुर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व साधनसामग्री तसेच मनुष्यबळ पुर्ण क्षमतेने अगोदरच तयार ठेवणे आवश्यक आहे. सदरचे काम युद्धपातळीवर दोन किंवा गरजेनुसार तीन शिफ्टमध्ये केले पाहिजे. दुर्दैवाने तसे नियोजन न झाल्याने पिकांना वेळेत पाणी देता येणे शक्य झाले नाही.

उत्तमराव निर्मळ (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com