यंदा रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता

आतापर्यंत अवघ्या पाच टक्केच पेरण्या
यंदा रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी हंगामातील पेरण्यांना उशीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला असून सध्या शेतात पाणीच पाणी साठलेले आहे. यातून वापसा होण्यास बराचा कालावधी लागणार असल्याने चालू हंगामात रब्बीच्या पेरण्या लांबण्याची शक्यता कृषी विभागाला आहे.

जिल्ह्यात मागील आठवडा अखेर 141 टक्के अतिरिक्त पाऊस झालेला असून यामुळे आतापर्यंत रब्बी हंगामाच्या अवघ्या पाच टक्के पेरण्या झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतात सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, सुर्यफूल, कापूस आणि अन्य पिकांमध्ये पाणी साठलेले असून शेतकर्‍यांना आधी या पिकांची विल्हेवाट लावावी लागणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अजूनही पावसाची शक्यता असून यामुळे रब्बी हंगामासाठी वापसा कधी होणार या चिंतेत शेतकरी आहेत.

नगर जिल्हा हा प्रमुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा असून जिल्ह्यात ज्वारी, गहू, आणि हरभारा पिके घेण्यात येतात. यासह कांदा पिकाचे प्रमाण अधिक आहे. मात्र, परतीचा पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी हाहाकार केलेला आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वाधिक क्षेत्र असून ते दक्षिण जिल्ह्यातील आहेत. नेमके दक्षिण जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने ज्वारी पेरणीसाठी काही काळ वाट पाहवी लागणार आहे. जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र पावणे पाच लाखांच्या जवळपास असून वेळेत वाफसा न झाल्यास ज्वारीच्या पेरण्यांना उशीर होणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षात शेवटच्या टप्प्यात अतिरिक्त पावसाने ज्वारीचे नियोजनापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी होत आहे. यंदा देखील अशीच परिस्थित निर्माण होण्याची भिती आहे.

जिल्ह्यात सध्या झालेल्या पेरण्यामध्ये 25 हजार हेक्टरच्या जवळपास ज्वारीचे क्षेत्र असून मका पिकाचे 123 हेक्टर, 403 हेक्टर हरभरा पिकांची पेरणी झालेली आहे. दिवाळीनंतर थंडी वाढल्यानंतर गव्हाच्या पिकाच्या पेरणीला सुरूवात होणार आहे.

Related Stories

No stories found.