
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
परतीच्या पावसाने काढता पाय घेतलनंतर जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग येण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 45 हजार 113 हेक्टवर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या झाल्या असून थंडीअभावी गहू आणि हरभरा पिकांची पेरणी अद्याप जेमतेम असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा पावसाने चांगलाच हात आखडता घेतल्याने खरीप हंगामातील पिकांची कामगिरी जवळपास निराशाजनक आहे. त्यानंतर काही प्रमाणात परतीच्या पावसाने जोर धरला. मात्र, जिल्ह्यात या पावसाचे सर्वदूर प्रमाण कमी-अधिक असल्याने त्यांचा रब्बी हंगामाला फारसा फायदा होणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची काढणी अंतिम टप्प्यात असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. यात प्रामुख्याने आतापर्यंत 44 हजार 88 हेक्टवर रब्बी ज्वारीची पेरणी झालेली असून थंडीचे प्रमाण कमी असल्याने आतापर्यंत अवघ्या 14 हेक्टवर गहू तर 230 हेक्टरवर हरभरा पिकांची पेरणी झालेली आहे.
यंदा कृषी विभागाने कमी पाण्यावर येणार्या ज्वारी पिकाचे क्षेत्र कसे वाढवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केल आहे. नगर जिल्हा परंपारिक रब्बी ज्वारी पिकाचा पट्टा असतांना गेल्या काही वर्षात जिल्ह्यात गहु आणि हरभरा पिकांचे क्षेत्र वाढले होते. मात्र, यंदा पाऊस कमी असल्याने कमी पाण्यावर येणार्या ज्वारी पिकावर कृषी विभागाने लक्ष केंद्रीत केलेले आहे.
अशी आहे पेरणी
ज्वारी 44 हजार 88 हजार हेक्टर, गहू 14 हेक्टर, मका 777 हेक्टर, हरभरा 230 हेक्टर, करडई 2 हेक्टर, नवीन ऊस लागवड 37 हजार 622 हेक्टर असून अशा प्रकारे नवीन ऊसासह जिल्ह्यात 82 हजार 736 हेक्टवर रब्बीच्या पेरण्या झालेल्या आहेत.