रब्बी हंगाम : 1 लाख 91 हजार हेक्टरवर पेरण्या

गहू, हरभर्‍याच्या पेरणीला सुरूवात : हंगामानंतरही ज्वारीची पेरणी सुरू
रब्बी हंगाम : 1 लाख 91 हजार हेक्टरवर पेरण्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परतीच्या पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने जिल्ह्यात रब्बी हंगामातील काही पिकांच्या पेरण्या उशीरापर्यंत सुरू आहेत. प्रामुख्याने रब्बी ज्वारीचा समावेश आहे. 15 ऑक्टोबरला ज्वारीच्या पेरण्या थांबत असतानाही जिल्ह्यात ज्वारीची पेरणी सुरू आहे. यामुळे मागील 15 दिवसांपूर्वी ज्वारीच्या पेरणी झालेल्या क्षेत्रात वाढ झाली आहे. हंगामात आतापर्यंत 1 लाख 91 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून त्याची टक्केवारी 26 टक्के आहे.

जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झालेला आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात अनेक भागात अद्यापही शेतातील पाणी सुकलेले नाही. वापसा न झाल्याने शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. सर्वाधिक क्षेत्र प्रस्तावित केलेल्या ज्वारी पिकाची स्थिती वाईट आहे. 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवघी 44 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होती. त्यात वाढ होऊन हे क्षेत्र 77 हजारांपर्यंत वाढले असले तरी झालेल्या पेरणीची टक्केवारी अवघी 16 टक्के आहे.

जिल्ह्यात अद्याप पाहिजे तेवढी थंडी पडण्यास सुरूवात झाली नसली तरी हरभरा आणि गव्हाच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात 642 हेक्टरवर गव्हाची आणि 4 हजार 514 हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झालेली आहे. याचसोबत जिल्ह्यात नवीन ऊस लागवडीचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 48 हजारांच्या जवळपास ऊसाचे क्षेत्र पोहचले असून त्यात मोठी वाढ अपेक्षीत आहे. कांदा पिकांचे क्षेत्र देखील वाढत असून 45 हजार हेक्टरपर्यंत कांदा लागवड झालेली आहे.

थंडीवरच गहू अन् हरभरा पिकाचे भवितव्य

गहू आणि हरभरा पिकांचे भवितव्य हे थंडीवरच अवलंबून राहणार आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात 1 लाख 53 हजार हेक्टरवर हरभरा पिकाचे तर 57 हजार हेक्टरवर गहू पिकाचे नियोजन केलेले आहे. मात्र, ज्वारी पिकाची प्रत्यक्षात पेरणी कमी झाल्याने ज्वारीचे क्षेत्र गहू, हरभरा आणि कांदा पिकांकडे वळणार आहे.

झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

ज्वारी 77 हजार 105 (16 टक्के), गहू 642 (1 टक्का), मका 991 (3 टक्के), हरभरा 4 हजार 514 (3 टक्के), करडई 6 (1 टक्के), ऊस लागवड 47 हजार 524 (46 टक्के) एकूण 1 लाख 91 हजार (26 टक्के).

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com