रब्बी हंगामाच्या पेरण्या संथ गतीने

नियोजन सव्वा सात लाखांचे : आतापर्यंत 2 लाख 42 हजार हेक्टरवरच पेरा
रब्बी हंगामाच्या पेरण्या संथ गतीने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परतीचा मुसळधार पाऊस त्यात गायब झालेली थंडी आणि विचित्र हवामानाचा परिणाम जिल्ह्यातील रब्बी हंगामाच्या पेरण्यावर झालेला आहे. जिल्ह्यात हंगामासाठी 7 लाख 26 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केलेले असतांना आतापर्यंत केवळ 2 लाख 42 हजार (33 टक्के) पेरण्या झालेला आहे. यात ऊस, कांदा, चारा पिके वगळल्यास 1 लाख 22 हजार हेक्टरवर उर्वरित पिकांच्या पेरण्या झालेल्या असून त्याची टक्केवारी 17 टक्केच आहे.

नगर जिल्हा हा प्रमुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. यात सर्वाधिक क्षेत्र ज्वारी पिकाचे असून यंदा परतीच्या पावसाने तडाखा दिल्याने अनेक तालुक्यात अद्याप शेतातील पावसाचे पाणी आटलेले नाही. परिणामी ज्वारीच्या क्षेत्रात मोठी घट आलेला आहे. ज्वारीचे क्षेत्र 4 लाख 77 हजार प्रस्तावित असतांना मागील महिन्यांत 45 हजार हेक्टवर ज्वारीची पेरणी झालेली होती. त्याची टक्केवारी अवघी 9 टक्के होती. ज्वारीचे क्षेत्र घटल्याने त्यांच्या जागी गहू, हरभरा आणि कांदा पिकाचे प्रमाण वाढले असा कृषी खात्याचा होरा असतांना विचित्र हवामानामुळे गहू आणि हरभरा पिकाच्या पेरणीला वेग आलेला नाही.

गहू आणि हरभरा पिकासाठी थंडी आवश्यक असून दिवाळी संपल्यानंतर जिल्ह्यात थंडीची चाहूल लागत असते. मात्र, अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे थंडी गायब झालेली आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीचे क्षेत्र अडीच हजार हेक्टरवर थांबलेले असून पेरणीची टक्केवारी अवघी 4 टक्के आहे. तर हरभरा पिकाच्या पेरणीचे क्षेत्र हे 11 हजार 483 हेक्टरपर्णंत पोहचले असून त्याची टक्केवारी 19 टक्के आहे.

कांदा पिकाची मुसंडी

ज्वारीचे क्षेत्र घटल्याने शेतकर्‍यांनी लाल कांदा पिकाला पसंती दिल्याने जिल्ह्यात कांदा पिकाची लागवड 50 हजार हेक्टरच्या टप्प्यात पोहचली असून यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. विशेष करून नगर आणि पारनेर तालुक्यात कांदा पिकाची लागवड लक्षणीय आहे. तर कांदा पिकांचे भाव स्थिर असल्याने शेतकरी कांदा पिकाकडे वळतांना दिसत आहे.

पेरणी कालावधीनंतर ज्वारीची पेरणी

जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत ज्वारी पिकाची पेरणी होत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. यंदा मात्र मुबलक पाणी असल्याने शेतकर्‍यांनी या कालावधीनंतर देखील ज्वारी पिकाची पेरणी केलेली आहे. यामुळे जिल्ह्यातील ज्वारी पेरणी झालेल्या क्षेत्राची संख्या 1 लाख हेक्टरांच्या पुढे सरकली आहे. उशीरा पेरलेल्या ज्वारीला पाण्याची गरज भासणार आहे.

अशी आहे परणी हेक्टरमध्ये

ज्वारी 1 लाख 5 हजार (22 टक्के), गहू 2 हजार 419 (4 टक्के), मका 2 हजार 683 (7 टक्के), हरभरा 11 हजार 483 (19 टक्के), उस लागवड 48 हजार 593 (47 टक्के), चारा पिके 16 हजार 544, कांदा 49 हजार 251, बटाटा 74, टोमॅटो 329, भाजीपाला 4 हजार 172, मसाला पिक 38, फुलपिक 362 आणि फळपिक 769 असे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com