रब्बीसाठी चार लाख 57 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

48 हजार क्विंटल बियाणांची मागणी
रब्बीसाठी चार लाख 57 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात यंदाचा गणेशोत्सव शेतकर्‍यांना पावला आहे. अखेर टप्प्यात जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्याच्या पावसाची सरासरी 92 टक्क्यांवर पोहचली आहे. यंदा कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी 4 लाख 57 हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले असून अनेक भागात रब्बीच्या पेरण्यांना सुरूवात झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. यंदा रब्बी हंगामासाठी 48 हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाचे प्रमाण कमी अधिक असतांना ऐनवेळी शेतकर्‍यांची अडचण नको, यासाठी कृषी विभागाच्यावतीने रब्बी हंगामासाठी 47 हजार 709 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवलेली असून यातील ज्वारी पिकाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. नगर जिल्हा हा परतीच्या पावसाचा आणि या परतीच्या पावसावर येणार्‍या रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र वाढत आहे.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातील पावसाने दर्शन दिल्यानंतर पाऊस गायब झाला. यामुळे खरीप हंगामातील कडधान्यांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कपाशी, कडधान्य पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने मध्य हंगाम आधारित पिक विम्याच्या भरपाईच्या 25 टक्के रक्कमेची विमा योजनेत सहभागी शेतकर्‍यांना अदा करण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान, गेल्या दहा दिवसांत दमदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीवाडीचे चित्र बदले आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून यामुळे रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. अजून काही दिवस परतीच्या पावसाचे असून या काळात पाऊस होण्याची चिन्हे आहेत. यामुळे खरिप नाही तर रब्बी हंगामातील पिके साधतील अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

जिल्ह्यात यंदा कृषी विभागाच्यावतीने रब्बी हंगामासाठी 4 लाख 57 हजार क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यात काही प्रमाणात कमी-अधिक बदल होण्याची शक्यता आहे. यात सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे 1 लाख 70 हजार हेक्टर आहे. तर गव्हाचे क्षेत्र 1 लाख 41 हजार असून त्या खालोखाल 1 लाख 15 हजार हरभरा पिक प्रस्तावित करण्यात आलेले आहे. चारा म्हणून मका पिकाचे क्षेत्र 31 हजार प्रस्तावित असले तरी उन्हाळ्यात संभाव्य चारा टंचाई म्हणून हे क्षेत्र दुप्पट होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी 4 लाख 25 हजार हेक्टवर पेरणी झाली होती. यात यंदा काही प्रमाणात कृषी विभागाकडून वाढ करण्यात आली आहे.

पिकनिहाय बियाणे मागणी

ज्वारी 3 हजार 400 क्विंटल, गहू 31 हजार 66 क्विंटल, हरभरा 12 हजार 107 क्विंटल, मका 1 हजार 124 क्विंटल असे 47 हजार 709 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली असून यात 33 हजार 264 क्विंटल बियाणे महाबीज कंपनीच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com