सलाबतपूर परिसरात रब्बी पिकांचे वाजले तीन-तेरा !

‘मुळा’तून त्वरित आवर्तन सोडण्याची मागणी
File Photo (Crops)
File Photo (Crops)

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर-शिरसगाव परिसरात पाण्यावाचून रब्बी पिकांचे तीनतेरा वाजले असून त्वरीत मुळा धरणातून आवर्तन सोडून पिके वाचवावीत अन्यथा धरणाचे पाणी वरातीमागून घोडे ठरणार आहे.

सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असून अनेक शेतकर्‍यांचे पाण्याचे सर्वच स्त्रोत बंद पडले असल्याने पिके पाण्यावाचून करपू लागली आहेत. यात भेंडा व तसेच सलाबतपूर व खडका, जळका, शिरसगाव, वाकडी या परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. मागील वर्षी खरिपाच्या पिकाला अस्मानी संकटाने कहर केल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांचा मशागतीसाठी केलेला खर्चही निघाला नाही.

तीन-चार वर्षांपासून निसर्गात झालेला बदल मुळा धरणाच्या पाण्याचे नियोजन नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात असल्याची चर्चा सध्या शेतकर्‍यांच्या गोटात सुरू आहे. पाणी नियोजन समितीकडून पाणी सोसायट्यांकडून पाण्याला मागणी नसल्याबाबत सांगितले जाते. मात्र सलाबतपूर परिसरात अनेक शेतकर्‍यांचे जलस्रोत हे डिसेंबर महिन्यातच संपतात. मग लाभार्थी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार या सोसायट्या मागणी नोंदवतात.

मात्र मुळा धरणातून नेवासा तालुक्यातील दोन्ही कारखान्यांसाठी आधीच पाणी सोडले जाते. त्यातच त्या परिसरातील जवळपास सर्वच शेतकर्‍यांना त्या पाण्याचा लाभ मिळतो. त्यांच्या विहीरी कूपनलिका यांच्या पाणीपातळीत कमतरता जाणवत नाही. त्यामुळे कारखान्याच्या परिसरात पाण्याविषयी कधीही ओरड होताना दिसत नाही.

सलाबतपूर शिरसगाव परिसरात मधल्या पट्ट्यातील जमिनी पाण्याचा लवकर निचरा होणार्‍या असल्याने डिसेंबर महिन्यातच जलस्रोताची पाणीपातळी खालावली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना पाटपाण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. आता जरी मुळा धरणातून आवर्तन सोडले. तरी अगोदर पाणी हे दहिगाव परिसरातील शेतकर्‍यांना मिळणार. त्यामुळे सलाबतपूर व परिसरातील पिके पाण्याअभावी ताणली गेली आहेत. आणि आणखी किती दिवसांनी पाणी मिळणार? या प्रश्नाने शेतकर्‍यांची चिंता वाढली असून मुळाचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करून अगोदर सलाबतपूर व टेलच्या शेतकर्‍यांना पाणी द्यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com