यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र घटणार!

गहू, कांदाऐवजी हरभरा, ज्वारीचा पेरा वाढण्याची शक्यता
यंदा रब्बी पिकांचे क्षेत्र घटणार!

वीरगाव |वार्ताहर| Virgav

शेती उभारणीसाठी अपुरा पाऊस हे मोठे आव्हान असते. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान दुष्काळाचे संकेत असतात. यंदा नेमकी हीच परिस्थिती उद्भवल्याने कसाबसा खरीप हातात आला. मात्र रब्बी उभारणीसाठी मोठे आव्हान शेतकर्‍यांपुढे असणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे रब्बी हंगामातील गहू, उन्हाळी कांदा या पाणीदार पिकांचा पेरा घटण्याची शक्यता असून हरभरा, ज्वारी आणि कमी कलावधीची भाजीपाला पिके वाढण्याची शक्यता आहे.ऊस आणि फळबागांनाही यावर्षी पाण्याचा फटका बसणार आहे.

जून महिन्यात यावर्षी बहुतांशी भागात पेरणी एवढा पाऊस झाला नाही. लांबलेल्या पेरण्यांनी जुलैच्या मध्यावधीत वेग घेतला. मात्र अलनिनोच्या प्रभावाने ऑगस्टमध्ये पाऊस प्रदीर्घ काळ सुट्टीवर गेल्याने खरिपाची वाढ खुंटली. कशीबशी तरलेली बाजरी, सोयाबीन, मका पिके आता हातात येतील. मात्र आगामी रब्बी उभारण्याची चिंता पाण्याअभावी शेतकर्‍यांसमोर असणार आहे. सरासरीपेक्षा कमी पावसामुळे नाशिक विभागातील 537 धरणांमध्ये 78.21 टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याने मृतसाठ्या व्यतिरिक्त असलेले पाणीही पूर्णपणे सिंचनासाठी मिळेलच याची शाश्वती नाही. पुरेसे पाणी मिळणार नसल्याने कांदा लागवड घटेल. गहू देखील शेतांमध्ये फारसा उभारलेला दिसणार नाही. फळबागा तर धोक्यात येणारच आहेत. नदीकाठ किंवा सिंचनक्षेत्र वगळता इतर क्षेत्रात हरभरा, ज्वारी, कमी पाण्याची चार्‍याची, अत्यल्प कालावधीचा भाजीपाला पिके वाढण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी भरपूर पाऊस होऊनही भूजलस्तर टिकला नाही. यंदा तर तो अधिकच खालावेल. रब्बीचा हंगाम उभारला तरी भूजलस्तर धोका देण्याची चिन्हे दिसतात.

नाशिक विभागातील धरणांमधून नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये शेती सिंचनाची आवर्तने मिळतील. त्यानंतर मात्र आवर्तनाबाबत शेतकर्‍यांचा जलसंपदा खात्याशी संघर्ष होऊ शकतो. अलनिनोमुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही पाऊस होत होता. यावर्षी अलनिनोमुळे मान्सून हंगाम संपल्यानंतर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता कमी आहे. रब्बी उभारणीसाठी शेतकर्‍यांकडे पैसा नाही. त्यातच दसरा-दिवाळी हे खर्चाचे सण तोंडावर आले. घायकुतीला आलेल्या वातावरणात सरकारने आता दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करता शेतकर्‍यांना मदत करण्याची गरज आहे.

दरवर्षी पावसाने खरिपाचे नुकसान होते. यंदा तो सुखासुखी हातात येतो आहे. रब्बी मात्र पूर्ण ताकदीने शेतात उभा राहील ही शक्यता मावळली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकरी लेकीबाळीसाठी उसन्या अवसानाने या दिवसांचा आनंद साजरा करताना दिसतील मात्र त्यांची मनातली घालमेल सरकारने ओळखायलाच हवी. काही नको फक्त शेतकरी उभा राहील निदान इतकी तरी मदत करा.आर्थिक मदतीचाही आनंदाचा शिधा शेतकर्‍यांना सरकारने द्यावा.

शेताच्या बांधावर जा

शिक्षण, नोकरी, आरोग्य आदींच्या खाजगीकरणात सरकार मश्गुल आहे. सर्वच जातींच्या आरक्षण आंदोलनाचे राज्यभर सूप वाजले आहे. दुर्दैवाने राज्यातील महत्त्वाचे मंत्री हे शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेण्याऐवजी व्यासपीठावरून आपली ताकद किती आहे हे दाखवण्यात व्यग्र आहेत. शेतकर्‍यांना उर्जा येण्यासाठी निदान त्यांच्या बांधावर फेरफटका मारून अडचणी समजावून घ्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com