धामणगाव रस्त्यावर आढळले मृत अजगर

वनविभागाच्या कार्यालयाच्यामागे अंत्यसंस्कार
धामणगाव रस्त्यावर आढळले मृत अजगर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी शहराजवळील धामणगाव रस्त्यावर एका मृत अजगर आढळले असून त्या मृत अजगरावर शनिवारी वनविभागाच्या कार्यालयाच्यामागे अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी धामणगाव रस्त्याच्या कडेला शहरातील युवक इजाज शख यांना एक अजगर दिसला. या रस्त्यावरून मॉर्निग वॉकसाठी शहरातील अनेक नागरिक जात असल्याने शेख यांनी तात्काळ ही माहिती सर्पमित्र फिरोज आतार यांना दिल्यानंतर आतार त्या ठिकाणी गेले. रस्त्याच्या बाजूला त्यांना एक साधारणतः सहा फुटी अजगर मृत अवस्थेत आढळून आला. या अजगराचे तोंड दगडाने ठेचून काढल्याचे दिसून येत होते.

आतार यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांना दिली. त्यानंतर त्यांनी मृत अजगर वनविभागाच्या ताब्यात देण्याचे सांगितले. आतार यांनी मृत अजगर वनविभागाच्या ताब्यात दिला. दरम्यान समजलेल्या माहिती नुसार बुधवारी रात्री धामणगाव रस्त्याकडे फिरायला गेलेल्या काही तरुणांनी रस्त्यावरून अजगर जात असल्याचे पाहून त्याच्या तोंडावर दगडाने मारहाण करत त्याला मारून टाकले. या प्रकाराविषयी मात्र प्राणिमित्रांमधून हळहळ व्यक्त होता आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com