कडाक्याच्या उन्हाळ्यात बहरला जांभळाच्या झाडांना भरगच्च मोहोर

कडाक्याच्या उन्हाळ्यात बहरला जांभळाच्या झाडांना भरगच्च मोहोर

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असताना यावर्षी जांभळाच्या झाडांना भरगच्च मोहोर आला आहे. त्यामुळे मे-जून अखेरीस जांभूळ फळांचा गोड-तुरट आस्वाद अनुभवता येणार आहे.

कडाक्याच्या उन्हात जांभूळाच्या झाडाला आलेले मोहोर कॅनॉल लगत, नदी काठी, शेतात असलेल्या झाडांना दिसत आहे. जांभुळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण 2-2 1/2 इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते. साधारण जानेवारी-फेब्रुवारीत जांभळाच्या झाडाला पालवी फुटू लागते व मार्च-एप्रिलमध्ये फुले धरू लागतात. फुले अगदी 5 मिमि एवढीच असतात. थोड्याच दिवसांत छोटी-छोटी फिक्कट हिरव्या रंगाची लांबट फळे धरू लागतात. मग हळूहळू पिकण्यास सुरुवात होते.

जांभूळ हा मूलतः दक्षिण आशिया व आग्नेय आशियात आढळणारा, जंबुल कुळातील (मिरटॅशिए कुळातील) सदाहरित, सपुष्प वृक्ष आहे. याला उन्हाळ्यात जांभळ्या रंगाची आणि गोड-तुरट चवीची फळे येतात. आकारमानाने ही फळे पेवंदी बोराएवढी असतात.

शास्त्रीय नाव सायझिजियम क्युमिनी.जांभूळ मधुमेह या रोगावर गुणकारी आहे, जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीला औषधी गुणधर्म आहे. जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम औषध आहे, जांभूळ रक्त शुद्ध करते. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केले जाते. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते.

जांभळाचे आसव बनवता येते. वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी जांभळाच्या पिकलेल्या फळापासून जेली, सिरप, स्क्वॅश असे उपयुक्त पदार्थ तयार करता येतात. जांभळापासून दारूही बनवली जाते. जांभळे किंवा जांभळापासून बनवलेले पदार्थ नियमित खाल्यामुळे यकृत मजबूत होते व मूत्राशयाचे आजार होत नाहीत. याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते.

Related Stories

No stories found.