रूग्णवाहिका खरेदी व्यवहारात साकूर मुळाखोरे पतसंस्थेची फसवणूक

घुलेवाडीतील अश्व मोटर्सच्या संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल
रूग्णवाहिका खरेदी व्यवहारात साकूर मुळाखोरे पतसंस्थेची फसवणूक

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील साकूर येथील मुळाखोरे सहकारी पतसंस्थेची रुग्णवाहिका खरेदी व्यवहारात 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍या घुलेवाडी येथील अश्व मोटर्सचे संचालक संतोष भाऊसाहेब काचोळे यांच्याविरुद्ध अखेर काल फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकूर येथील मुळाखोरे पतसंस्थेने समाजोपयोगी कामासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. संगमनेर येथील महिंद्रा शोरूम मधील दीपक डूंगा यांच्याशी संपर्क साधून पतसंस्थेसाठी रुग्णवाहिका खरेदी करावयाची असल्याचे सांगितले. डूंगा यांनी घुलेवाडी येथील अश्व मोटर्स या शोरूमचे नाव सुचविले. यानंतर पतसंस्थेच्या पदाधिकार्‍यांनी अश्व मोटर्सचे संचालक संतोष काचोळे यांच्याशी संपर्क साधला. या शोरूममध्ये शुभम रवींद्र खरात व यासीन शेख हे कामास होते.

रुग्णवाहिकेची बुकिंग केल्यास दि.1 डिसेंबर 2020 रोजी नवीन रुग्णवाहिका देऊ, असे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिकेचा व्यवहार झाल्यानंतर पतसंस्थेच्यावतीने दि.12 ऑक्टोबर 2020 रोजी रुग्णवाहिका बुकिंगसाठी एक लाख रुपयांचा व अ‍ॅडव्हान्स म्हणून 20 ऑक्टोबर रोजी आणखी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. रुग्णवाहिका देत आहोत, असे सांगून 3 लाख 80 हजार रुपये ट्रान्सफर करावे, असे संतोष काचोळे यांनी सांगितले.

त्यामुळे पतसंस्थेने दि.5 नोव्हेंबर 2020 रोजी 3 लाख 80 हजार रुपये ट्रान्सफर केले. पैसे घेऊनही काचोळे यांनी रुग्णवाहिका दिली नाही. अश्व मोटर्सच्या संचालकांनी रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ केल्याने मुळाखोरे पतसंस्थेच्या व्यवस्थापकांनी दि. 8 फेब्रुवारी 2021 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत संगमनेर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे पतसंस्था व्यवस्थापकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे धाव घेतली आहे. तक्रार निवारण पोर्टलवर तक्रार करून रुग्णवाहिका न देणार्‍या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर काल अश्व मोटर्सचे संचालक संतोष काचोळे याच्याविरुद्ध भादंवि. कलम 420, 406 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.