पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिक यांच्या देखरेखीखाली

जलस्वराज टप्पा- 2 अंतर्गत अंदाजे 17 कोटी खर्चाच्या पुणतांबा पूरक पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून या योजने अंतर्गत ग्रामस्थांना मीटरमार्फत पाणीपुरवठा केला जाणार आहे. योजनेत केलेल्या तरतुदीनुसार ग्रामस्थांना नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू झाले असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

2019 च्या अंदाजे 13852 व तरंगती 1212 लोकसंख्येनुसार प्रति माणसी प्रत्येक दिवशी 70 लिटर पाणीपुरवठा करणे प्रस्तावात अंतर्भूत आहे. त्यानुसार 1.380 दशलक्ष पाण्याची गरज आहे. हे गृहित धरून मुख्य संतुलित जलकुंभासह इतर 4 पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्णत्वाकडे आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा दर घरगुतीसाठी 7 रुपयांत 1000 लिटर तर बिगर घरगुती 14 रुपये आहे. गावात घरांची व नळ कनेक्शनची संख्या 2019 प्रमाणे 1704 तर 2032 मध्ये 2340 गृहीत धरली आहे.

या पुरक पाणीपुरवठा योजनेत 18 वाडी, 19 वाडी, चांगदेवनगर, चव्हाण वस्ती, बोरबने वस्ती सह 11 वाड्यांचा समावेश आहे. सर्व भागात पाण्याची कार्यक्षमपणे वितरण व्यवस्थेसाठी 90, 110, 140, 160 व 200 मि.मीटर आकाराच्या एसडीपीई पाईपलाईन योजनाही बहुतेक ठिकाणी पूर्ण झाली आहे.

पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्च साठवणूक तलाव धरून 10497 रुपये आहे तर वार्षिक परीक्षणाचा खर्च 2019 प्रमाणे 2352487 असून अपेक्षित उपन्न 2019 प्रमाणे 3152870 आहे. योजनेची 3 महिने चाचणी घेऊन 9 महिने दैनंदिन देखभाल करण्यात येणार असून त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडे वर्ग होणार असल्याचे समजते.

पाणीपुरवठा योजनेचे संपूर्ण काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जात असून अधिकारी वर्गामार्फत प्रत्येक कामावर देखरेख केली जात असून कामात त्रुटी राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच पाणीपुरवठा योजनेचे काम व्यवस्थित होते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार तीन समित्या संघटित केल्या आहेत.

त्यानुसार सर्वांचे कामावर लक्ष आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचे तसेच जागरूक नागरिकांचेही लक्ष असल्यामुळे काम चांगल्याप्रकारे सुरू असल्याचे ग्रामस्थांचे मत असून योजनेमार्फत लवकरच ग्रामस्थांना पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.