पुणतांबा पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले

साडेचार वर्षांत साठ टक्के काम
पुणतांबा पाणीपुरवठा योजनेचे काम रेंगाळले

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

जागतिक बँकेच्या सहकार्याने जलस्वराज टप्पा-2 अंतर्गत पुणतांबा गावासाठी 17 कोटी रुपये खर्चाच्या पूरक पाणीपुरवठा योजनेचे साडेचार वर्षात निम्मे काम पूर्ण झाल्यामुळे ही योजना केव्हा पूर्ण होईल याबाबत साशकता निर्माण झाली आहे.

जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व पुणतांबा ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा नुकताच घेण्यात आला. ग्रामस्थांनी योजनेचे अवघे 40 टक्के काम झाल्याचे सांगितले तर अधिकार्‍यांनी 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला. पुणतांबा गावासाठी पहिली पूरक पाणीपुरवठा योजना 1984 मध्ये कार्यान्वित झाली होती आता 34 वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये नवीन पूरक पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे.

आतापर्यंत गोदावरी उजव्या कालव्या पासून ते पाणीपुरवठा योजनेपर्यंत 5 किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी 36 दक्षलक्ष लिटर क्षमतेचा मुख्य साठवण तलाव मुख्य संतुलन टाकी व इतर जलकुंभ व पाणी पुरवठ्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेल्या अंतर्गत जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. गावात बर्‍याच ठिकाणी पाणीपुरवठ्याची चाचणी घेणे सुरू झालेले आहे. मात्र काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी व काही ठिकाणी जास्त अशी अवस्था असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. योजनेत पुणतांबा व रास्तापूरचा समावेश आहे. रास्तापूरमधील 4 वाड्या तसेच अठरावाडी, एकोणावीसवाडी, चांगदेवनगर, पिंपळवाडी रोड, बनकर वस्ती, चव्हाण वस्ती यासह अनेक वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. मात्र अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत.

मनसेचे तालुकाप्रमुख गणेश जाधव यांनी मागील वर्षी साठवण तलावातील दगडी पिंचिग कोसळल्यापासून निकृष्ट कामाबाबत सातत्याने आवाज उठविला आहे. शिवसेनेचे सुहास वहाडणे यांनी तर मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन कामाच्या चौकशीची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी चौकशीचा लेखी आदेशही दिला होता. मात्र चौकशी अहवाल अद्यापही पुणतांबा ग्रामस्थांसमोर आलेला नाही. योजनेचे काम पूर्ण झाल्यावर 3 महिने चाचणी व 9 महिने दैनादिन देखभाल केली जाणार आहे.

व कार्यादेशानुसार काम पूर्ण झाल्यावर योजना तातडीने ग्राम पंचायतीला हस्तांतरित करण्यात येणार आहे. या पाणीपुरवठा योजनेचा वार्षिक परीक्षणाचा खर्च अंदाजे 23,52,487 (सन 2019) तर अपेक्षित वार्षिक उत्पन्न 31,52,870 (सन 2019) गृहीत धरलेला आहे. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार पाणीपुरवठा योजनेचे 90 टक्के काम पूर्ण झाले असेल तर उरलेले काम दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

चाचणी दिल्यानंतर ही योजना ग्रामपंचायतीकडे लगेच हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत सत्ताधार्‍यांची मुदत लवकरच संपणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजना, तिचा देखभालीचा खर्च तसेच पाणीपट्टी वसुली हे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर राहणार आहे तसेच पुणतांबेकर पाणीपुरवठा योजनेचे पाणी केव्हा मिळणार याकडे लक्ष ठेऊन आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com