पुणतांबा पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलाव दुरुस्तीचे काम सुरु

पुणतांबा पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलाव दुरुस्तीचे काम सुरु

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा गावाची पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुणतांबा रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीला जलजीवन मिशन योजने अंतर्गत 15 कोटी 62 लाख 97 हजार रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजने अंतर्गत येथील गोदावरी उजव्या कालव्याच्या उत्तर बाजूला असलेल्या अंदाजे 52 दशलक्ष क्षमतेच्या साठवणूक तलावाच्या दुरुस्तीचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे.

जळगाव हददीत असलेल्या साठवणूक तलावाचे काम 1983 च्या दरम्यान झाले होते. त्यानंतरही तलावातील गाळ काढणे फ्लास्टीक चा कागद बदलणे ही कामे काही वर्षापूर्वी झालेली आहे. आता जलजीवन मिशन योजने अंतर्गत ह्या साठवणृक तलावाच्या दुरुस्ती साठी 3 कोटी 6 लाख 29 हजार 426 रुपयांची तरतूद करण्यात आली. कोणताही गाजावाजा न करता साठवणूकीच्या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले.

मात्र विरोधी गटाने तलावावर जाऊन काम बंद पाडले. तसेच ग्राम सभेत ह्या विषयावर चर्चा झाल्यानंतर सध्या काम सुरु आहे. मात्र या कामावर पुणतांबा ग्रामस्थांनी गांभीर्याने लक्ष ठेवले नाही तर जागतिक बँकेच्या सहकार्याने जल स्वराज टप्पा -2 अंतर्गत अंदाजे 17 कोटी रुपये खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेचे जे झाले तशीच अवस्था या योजनेची होईल की काय अशी साशंकता ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली.

साठवण तलावाच्या दुरुस्तीमध्ये गाळ काढणे काळ्या मातीचे आच्छादन करणे, बिम टाकणे, नव्याने दगडी पिंचिग करणे, फ्लास्टिकचा कागद टाकणे, तलावाला कंपाऊंड करणे आदी कामाचा समावेश आहे. सध्या दगडी पिंचिग काढून तलावाच्या दक्षिण बाजूला लेव्हल करण्यासाठी जेसीपीच्या साहाय्याने मुरूम काढण्याचे काम सुरु आहे.

पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष डॉ. धनजंय धनवटे यांचे मात्र योजनेच्या कामावर सातत्याने लक्ष होते. जल स्वराज योजनेच्या कामाची सर्व माहिती लेखी स्वरूपात जनतेसमोर आली तर ग्रामस्थांना वस्तुस्थिती समजेल. तसे झाले नाही म्हणून या योजनेच्या निकृष्ट कामाबाबद आजही आरोप केले जातात. मागील आठवड्यात पुणतांबा येथे आलेले या योजनेच्या शिल्पकार स्नेहलता कोल्हे यांनी तर जलस्वराज योजनेच्या कामाच्या त्रुटीवरच बोट ठेवले. त्रुटी दूर न झाल्यास ग्रामपंचायतीकडे ही योजना हस्तांतरित करू नये असे स्पष्ट केले. आता जलजीवन मिशन योजने अंतर्गत साठवणुकीच्या तलावातील दुरुस्ती चे काम सुरु आहे ही योजना नवीन आहे.

जल जीवन मिशन योजने अंतर्गत विविध कामे अंर्तभूत आहेत. डिसेंबर अखेर ही कामे पूर्ण करावयाची आहेत. 1984 नंतर पुणतांबा गावासाठी जलस्वराज टप्पा -2 तसेच जलजीवन मिशन योजने अंतर्गत अंदाजे 32 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु आहेत. या योजनावर पुणतांबेकरांचे लक्ष नसेल तर भविष्यात त्याची किंमत पुणतांबा ग्रामस्थांनाच मोजावी लागेल हे वास्तव आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com