पुणतांबा पाणी योजनेच्या कामात अनेक त्रुटी

डिपीआर नुसारच योजना ताब्यात घेऊ - जाधव
पुणतांबा पाणी योजनेच्या कामात अनेक त्रुटी

पुणतांबा |वार्ताहार| Puntamba

पुणतांबा ग्रामपंचायतीच्या जल स्वराज टप्पा क्र.2 च्या गावच्या पाणी पुरवठा योजनेचा डिपीआर बदलून निकृष्ट काम करण्यात आले. वाड्या वस्त्यांवर पाणी योजनेचे पाईप लाईन टाकली नाही. अनेकांच्या नळांना पाणी येत नाही. खोलगट भागात टाकी बांधल्याने उंचवट्यावर पाणी पोहचत नाही. या कामात अनेक त्रुटी आहेत. तेव्हा ही योजना ताब्यात घेणार नाही. डिपीआर नुसार परीपूर्ण योजनाच ताब्यात घेऊ अन्यथा आदोलन करू ,असा इशारा पुणतांबा विकास आघाडीचे नेते धनंजय जाधव यांनी दिला आहे.

पुणतांबा ग्रामपंचायतीमध्ये पुणतांबा विकास आघाडीची सत्ता येताच पाणी योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु जूनी सव्वा दोन कोटीची पाणी योजना तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या पुढाकाराने ताब्यात घेतली. मात्र ही योजना करूनही गावच्या पाणी पुरवठ्यात काहीच सुधारणा झाली नाही. याचा आभ्यास करूनच गावच्या पाणी योजनेच्या प्रस्ताव करण्यात आला. सुरवातीला मुख्यमंत्री पेयजल योजनेत प्रस्ताव करण्यात आला. मात्र तरतूद कमी असल्याने जलस्वराज टप्पा क्र. 2 मध्ये पुणतांबा पाणी योजनेचा समावेश करण्यात आला.

तत्कालीन राज्य सरकारने विशेष बाब म्हणून शेती महामंडळाची जागा पुणतांबा गावच्या पाणी योजने करता मिळाली. 17 कोटी रूपयांची पाणी योजना मंजूर झाली. पुढे ग्रामपंचात निवडणुकीत जाधव गटाची सत्ता जाऊन धनवटे गटाची सत्ता आली. जुन्या डिपीआरमध्ये वाड्या वस्त्यावर पाईप लाईन करून फिल्टर प्लॉन्ट होता पण डिपीआरच बदलण्यात आला. आजूनही वाडया वस्त्यांवर पाईप लाईन गेलेली नाही. सध्या टेस्टिंग चालू आहे. अनेक भागात पाणी पोहचत नाही. अनेक त्रुटी या कामात आहेत.

पाणी पुरवठा कमिटीने डिपीआर प्रमाणे काम करून घेणे आवश्यक असताना तसे झाले नाही. कान्हेगाव खळ्या जवळ टाकी घेऊन श्रीरामपूर रोडच्या सांबारे वस्तीवर पाणी कसे जाईल असा प्रश्न उपस्थित करून अध्यक्षाने डिपीआर बदलला असा आरोप जाधव यांनी केला. वाकडी जळगाव रामपूररोड वरील वस्त्यावर पाईपलाईन गेल्या शिवाय हास्तांतरण होऊ देणार नाही. पाईपलाईन चुकीची झाली आहे म्हणून पूर्ण दाबाने पाणी येत नाही. संपूर्ण योजनेच्या चौकशीची मागणी करणार असून तोपर्यंत योजना ताब्यात घेणार नाही.

यासाठी लवकरच आंदोलन करणार असल्याचा इशारा धनंजय जाधव यांनी दिला आहे. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, चंद्रकांत वाटेकर, गणेश बनकर, प्रशांत राऊत, भाऊसाहेब जेजुरकर, साहेबराव बनकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com