
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
गावाला वरदान ठरणारी जलस्वराज्य टप्पा क्र.2 योजनेतून सुरू असलेल्या 17 कोटी खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पाणी योजना कार्यान्वित होणार असल्याचे सरपंच डॉ धनंजय धनवटे यांनी सांगितले.
जलस्वराज्य टप्पा 2 या 17 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणी योजनेचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही योजना कधी कार्यान्वित होणार याबाबत मोठी चर्चा असून योजनेच्या कामात काही त्रुटी आहेत तर काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडूनही योजनेच्या कामाबद्दल योग्य माहिती मिळत नसल्याने कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
परंतु आमदार विखे यांच्या माध्यमातून योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला नविन स्वरूप देण्यात आले. तसेच जुन्या पाणी साठवण तळ्या करिता पाच कोटींचा प्रस्ताव लवकरच मार्गी लागणार आहे. जल शुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होत आहे. गावाच्या विविध भागात योजनेची टेस्टींग सुरू आहे. काही भागात टेस्टींग यशस्वी झाली आहे. नविन योजनेची नळ जोडणी राहिलेल्या नागरिकांनी त्वरीत घ्यावी. यामध्ये 5 कि.मी. अंतराची जलवाहिनी, नवीन साठवण तलाव, चार जलकुंभ, गाव अंतर्गत जलवाहिनी आणि मीटर पध्दतीने नळ कनेक्शन ही कामे पूर्ण होऊन काही भागात पाणी चाचणी यशस्वी झाली आहे.
नवीन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगून गावाच्या संपूर्ण भागाची पाणी चाचणी टप्प्या टप्प्याने पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे. नळकनेक्शन न घेतलेल्या नागरिकांनी तातडीने कनेक्शन घ्यावे व याबाबत काही तक्रारी असल्यास पाणीपुरवठा कर्मचार्यांशी संपर्क करावा, असे आवाहन डॉ. धनवटे यांनी केले आहे.