पुणतांबा गावच्या पाणी योजनांचे राजकीय वादळ

भाग-01 || गावकर्‍यांची तहान भागणार का? हे आगामी काळात कळेल
पुणतांबा गावच्या पाणी योजनांचे राजकीय वादळ

पुणतांबा | Puntamba

पुणतांबा गावच्या दोन पाणी योजनांत मोठे राजकारण होऊन गावकर्‍यांची तहान भागली नाही. सध्या सुरू असलेली जलस्वराज टप्पा क्र.2 ही पाणी योजना पूर्ण झाल्यावरच गावकर्‍यांची तृष्णा पूर्ण होते की नाही हे आगामी काळातच कळेल.

राजकिय क्षेत्रात गावातील अनेकांनी राज्यस्तरावर नेतृत्व केलेले आहे. यात कै. भास्करराव जाधव विरुद्ध मुरलीधर थोरात यांचा सत्ता संघर्षकाळ गाजला होता. याच काळात पद्मभूषण डॉ. कै. बाळासाहेब विखे यांचे मार्गदर्शन व अण्णासाहेब म्हस्के यांच्यामुळे 1982 ला पहिल्यांदाच गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. परंतु त्याही वेळेस साठवण तलाव कुठे घ्यावयाचा याचा स्थानिक राजकीय वाद चांगलाच रंगत योजनेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यावेळचे सरपंच मुरलीधर थोरात यांनी राजकीय खेळीत बाजी मारली होती.

1984-85 ला पाणी योजना कार्यान्वीत झाली. परंतु गावचा वाढलेला विस्तार, वाढती लोकसंख्या यामुळे ही योजना पुन्हा गावाला अपुरी पडू लागली. अनेक वेळा निवडणुकीत पाणी योजना करण्याचे आश्वासन देण्यात येत असे. आ. राधाकृष्ण विखे प्रणीत जनसेवा मंडळाची निर्विवाद सत्ता ग्रामपंचायतीत 1998 ते 2003 या कालावधीत आली. तत्कालीन सरपंच सर्जेराव जाधव यांच्या कार्यकाळत जीवन प्राधिकरण कोपरगाव कार्यालय अतंर्गत पुरक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. योजना मंजूर होता होता ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपत आला. परंतु पुरक पाणी पुरवठा योजनेकरिता 10 टक्के लोकवर्गणीची अट शासनाने निश्चित केल्यामुळे पावणेदोन कोटींची पुरक पाणीपुरवठा योजना लोक वर्गणी अभावी रखडली.

कै. बाळासाहेब विखे यांनी रखडलेल्या पाणी योजनेच्या पूर्ततेसाठी लोकवर्गणी करण्याचे जाहीर केले आणि माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा मंडळाची सत्ता ग्रामपंचायतीत येऊन रवींद्र लुंपाटकी हे सरपंच झाले. रखडलेल्या पावणेदोन कोटीच्या पुरक पाणी पुरवठा योजनेच्या लोकवर्गणीची जुळवाजुळव सुरू झाली. याच काळात तत्कालीन महाराष्ट्र सरकारमध्ये विधी व न्यायमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री साईबाबा संस्थानकडून पाणीपुरवठ्यासाठी 11 लाखांची लोकवर्गणी दिली. हा धोरणात्मक निर्णय करून पाणी योजनेचा मार्ग मोकळा केला. यासाठी तत्कालीन आ. अशोकराव काळे यांनी 4 लाख रुपये लोकवर्गणीसाठी दिले. ही लोकवर्गणीची रक्कम जीवन प्राधिकरणाकडे जमा करून पुरक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळाली.

ग्रामपंचायत निवडणूक होऊन आ. राधाकृष्ण विखे प्रणीत जनसेवा मंडळ व अशोकराव काळे प्रणीत लोकसेवा मंडळात ग्रामपंचायत स्तरावर एकत्र येऊन 2008 ते 2013 काळे गटाचे सरपंच मुरलीधर थोरात व आ. विखे गटाचे उपसरपंच वंदना धनवटे यांच्यावर पुरक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची जबाबदारी आली. आणि ही योजना पूर्ण करण्यात यशस्वी झाले. याचवेळी धनंजय जाधव प्रणित पुणतांबा विकास आघाडीचे पाच ग्रामपंचायत सदस्य विरोधात होते.

पुरक पाणीपुरवठा योजनेतून गावांतर्गत अदांजे दहा कि.मी. पाईपलाईन टाकण्यात आली. शिवाय साठवण तळ्यात वॉटर प्रुफ प्लॅस्टीक कागद टाकण्यात आला तर फिल्टर प्लॅन्ट नव्याने बनविण्यात आला. परंतु गावच्या पाणी वितरणात कुठलाही परिणाम झाल्याचे दिसले नाही. दिवसाड वितरीत करण्यात येणार्‍या पाण्याचा कालावधी वाढत जाऊन ऐन उन्हाळ्यात गावकर्‍यांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली. काहींनी तर श्रीरामपूरहून ड्रमने पाणी आणणे पसंत केले.

2013 सालची ग्रामपंचायत निवडणूक आरोप प्रत्यारोपाने गाजली. याच धामधुमीत धनंजय जाधव प्रणित पुणतांबा विकास आघाडीच्या 12 जागा निवडून आल्या. सरपंच छायाताई जोगदंड व उपसरपंच बलराज धनवटे यांच्या माध्यमातून धनंजय जाधव यानी निवडणुकीत दिलेल्या आश्वसानाप्रमाणे गावाला सुधारीत पाणी योजना कशी देता येईल यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी प्रस्ताव सादर केला. परंतु पुणतांबा पाणी योजनेचा प्रस्ताव जलस्वराज टप्पा क्रमांक -2 मध्ये समावेश झाला.

योजनेच्या साठवण तळ्याला आवश्यक जागा ग्रामपंचायतीच्या नावावर नव्हती. त्यासाठी पुन्हा वेगळे प्रयत्न त्यांनी सुरू केले. जागेसाठी व संपूर्ण पाणी योजना मंजूर व्हावी म्हणून त्यावेळच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष आग्रह धरला आणि विशेष बाब म्हणून सवलतीच्या दरात शेती महामंडळाची जागा पाणी योजनेच्या साठवण तळ्यासाठी मिळावा म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार गावातून लोककवर्गणी करून तर 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून जागा ग्रामपंचायतींच्या नावावर करण्यासाठी आवश्यक रक्कम शेती महामंडळाकडे जमा केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com