
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
राज्यात सर्वच ठिकाणी चालू वर्षी अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. मे महिन्यापर्यंत साखर कारखाने सुरू ठेवले तरी हा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. पुणतांबा परिसर व त्या लगत असणार्या राहाता, कोपरगाव, वैजापूर, श्रीरामपूर तालुक्यामध्येही अतिरिक्त उसाचा गंभीर प्रश्न आहे. उसाचे क्षेत्र सातत्याने वाढत आहे. भविष्यातही हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून पुणतांबा येथे खासगी तत्वावर साखर कारखाना सुरू करण्यासाठी योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी माजी सरपंच सुधाकर जाधव यांनी केली आहे.
पुणतांबा येथे 1932 च्या दरम्यान खासगी तत्वावर चांगदेव शुगर मिल्स हा कारखाना सुरू करण्यात आला होता. तो 1982 पर्यंत चांगल्या अवस्थेत सुरू होता. अंदाजे 750 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमता असलेल्या या कारखान्यामुळे परिसर व लगतच्या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना कारखान्याला ऊस देण्यात कधीही अडचण आली नाही. 1948 मध्ये राज्यात सहकारी क्षेत्राचा उदय झाला व साखर कारखाना क्षेत्रातही सहकारी तत्वाचा शिरकाव झाल्यामुळे व इतर काही कारणामुळे खाजगी तत्वावरील बहुतांशी साखर कारखाने बंद पडले. त्यात 1984 मध्ये चांगदेव कारखाना बंद पडला व 1986 मध्ये कारखान्याचा परवाना व यंत्रसामुग्री विकण्यात आली.
आजही चांगदेव कारखान्याच्या ठिकाणी त्यांची जागा, गोडाऊन व अधिकारी कर्मचारी वर्गाची निवासस्थाने आहेत. कारखान्याच्या मालकांनी मनात घेतले तर या ठिकाणी साखर कारखाना सुरू होऊ शकतो. पुणतांबा येथे पर्यायी उद्योग सुरू करावा ही 1986 पासून ग्रामस्थांची मागणी आहे. पर्यायी उद्योगासाठी पुणतांबा-कोपरगाव रोडलगत आजही 10 एकराची जागा राखीव आहे. अलिकडे सहकारी तत्वावरील अनेक कारखाने तोट्यात चालत असून त्यांची दिवाळखोरी जाहीर करून सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ते खासगी तत्वावर सुरू केले आहेत.
अहमदनगर जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही. म्हणून सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील एखाद्या साखर सम्राटाने किंवा मोठ्या उद्योगपतीने पुणतांबा येथे साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी श्री. जाधव यांनी केली. या मागणीसाठी पुणतांब्याचे शिष्टमंडळ चांगदेव कारखान्याचे मालक श्री. मोरारका यांना लवकरच भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.