पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

पुणतांबा-रास्तापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संगीता बाळासाहेब भोरकडे यांनी आपल्या पदाचा लेखी राजीनामा ग्रामविकास अधिकारी

सोमनाथ पटाईत यांच्याकडे सादर केला असून सदर राजीनामा पत्राची तांत्रिक बाजू तपासून तो मंजूर केल्याची माहिती श्री. पटाईत यांनी दिली आहे.

ही ग्रामपंचायत माजी मंत्री आ. राधाकृष्ण पाटील विखे गटाच्या ताब्यात आहे. 17 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत त्यांचे बहुमत आहे. तसेच सरपंचही आ. विखे गटाचे आहेत. आ. विखे गटाच्या सदस्यांनी सातत्याने आग्रह धरल्यामुळे वंदना धनवटे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या जागेवर सौ. भोरकडे यांची निवड झाली होती.

मात्र त्यांच्या निवडीच्या वेळी इच्छुक सदस्यांना किमान 11 महिन्यांचा कार्यकाल मिळावा, असे ठरले होते. त्यानुसार श्रेष्ठींच्या निर्णयानुसार सौ. भोरकडे यांनी यांनी राजीनामा दिला आहे.

त्यांच्या राजीनामा पत्रानंतर 7 दिवसांचा कालावधी संपल्यावर नवीन उपसरपंचपदाच्या निवडीबाबत अधिकृत कार्यक्रम केला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास आधकारी सोमनाथ पटाईत यांनी दिली आहे भावी उपसरपंचपदासाठी विखे गटाचे बहुतांशी सदस्य उत्सुक आहेत. कालपासून राजकीय हालचाली सुरू झाल्या असून काही शिष्टमंडळ आ. विखे यांना भेटणार असल्याची चर्चा आहे.

कारण उपसरपंचपदाचा निर्णय हे आ. विखेच घेणार आहेत. नवीन उपसरपंच रास्तापूर किंवा चांगदेवनगर येथील असण्याची शक्यता आहे. कारण सरपंच पुणतांबा गावातील आहे. उपसरपंचपदाची निवड गावात राहणार्या सदस्याची केली तर नाराजी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मागील दोन्ही उपसरपंचपदी महिलांची वर्णी लागली होती. आता एखाद्या अभ्यासू तसेच पूर्णवेळ देऊ शकणार्या पुरुष सदस्याची या पदावर निवड होणार का? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.