
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
गोदावरी कालव्याला सध्या सुरू असलेल्या पाण्यातून अखेर पुणतांबा साठवण तलावात पाणी सोडले आहे. या तलावाचे काम करणारे ठेकेदार स्वतः जातीने लक्ष देऊन येथे ठाण मांडून बसले आहेत.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे व विशेष पाठपुराव्यामुळे पुणतांबा गावासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झालेली आहे. या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी 9 कोटींचा निधी उपलब्ध झाला. या निधी अंतर्गत 3 कोटी 24 लाख खर्चाची तरतूद असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याजवळ जळगावच्या हद्दीत जुन्या साठवणूक तलावाच्या दुरुस्तीचे काही कामे वगळता पूर्ण झालेली आहे.
तीन महिन्यांपूर्वी हे काम सुरु झाले असता विरोधी गटाने काम बंद पाडून या विषयावर तातडीने ग्रामसभा घेण्यास भाग पाडले होते. ग्रामसभेनंतर काम पुन्हा सुरू झाले. या कामात तलावात काळी माती टाकणे, सिमरन पेपर टाकणे, बिम टाकणे, दगडी पिचिंग करणे यासह अनेक कामाचा आंतर्भाव होता. कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थ व विरोधी गटाने सातत्याने शंका घेतलेली आहे.
10 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. तोपर्यंत पाणी सोडून नये, अशी भूमिका घेतली होती. काहींनी गावची पाणी टंचाई विचारात घेता गोदावरी कालव्यातून तातडीने पाणी सोडण्यात यावे, असा आग्रह धरला होता. अखेर दोन दिवसापासून या तळ्यात पाणी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाणी सोडत असताना हे काम घेतलेले ठेकेदार तळ्यावर ठाण मांडून होते. तळ्यात पाणी सोडले व तळे भरले म्हणजे या कामाबाबतचा विषय संपला असे गावात काल दिवसभर चर्चा होती. मात्र तळ्यातील कामाबाबत विरोधी गटाकडून येत्या आठ दिवसांत पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असून काहींनी नुकतीच तळ्यावर जाऊन पाहणी सुद्धा केली आहे.