
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
परिसरातील गोपालक तसेच काही शेतकरी सोयाबीन पिकाचे भुस गोळा करण्यासाठी सध्या भटकंती करताना दिसून येत आहे.
पुणतांबा परिसरात चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कपाशी सह अनेक पिके बरेच दिवस पाण्याखाली होते. तसेच या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले होते. अतिवृष्टीमुळे शेतात तसेच शेताच्या बांधावर असलेले गवत तसेच घासाचे पीक सुद्धा खराब झालेले होते. त्यामुळे बहुतेक शेतकरी वर्ग जनावरांच्या चार्यासाठी मकावर अवलंबून होता. मका तसेच विविध प्रकारची पेंड यांच्या बरोबरच दुभत्या जनावरांसाठी सोयाबीनचे भुस फारच उपयुक्त ठरते. त्यामुळे बहुतांशी शेतकरी वर्गाने भुस गोळा करण्यासाठी धावपळ सुरू केलेली दिसून येते. भुसाचे दर गुणवत्तेनुसार प्रति पोते 150 ते 200 रुपये आहे.
श्रीरामपूर, कोपरगावसह अनेक तालुक्यांच्या ठिकाणी जेथे म्हशीचे तबेले आहेत तसेच गायींचा गोठा आहे तेथेही सोयाबीनच्या भुशाची आवश्यकता असते. अशा ठिकाणी भुस पुरविण्यासाठी काही व्यापारी गावोगाव भुस गोळा करण्यासाठी फिरत आहे. तसेच प्रत्येक शेतकर्याच्या वस्तीवर जाऊन तुमच्याकडे ज्यादा भुस आहे का? याची विचारणा करताना दिसून येत आहे. सध्या पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे मका, घास, उसाचे वाढे तसेच सोयाबीनचे भुस यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.