पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्गासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटणार

पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्गासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटणार

पुणतांबा (वार्ताहर)

दौंड मनमाड मार्गावरील रेल्वे मार्गाचे अंतर तब्बल ९४ किलोमीटरने कमी करण्यासाठी चार वर्षापूर्वी सर्वेक्षण झालेल्या पुणतांबा-रोटेगाव या नवीन रेल्वेमार्गास मंजुरी मिळवून निधी मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राहाता व वैजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

मराठवाड्यासह नगर जिल्ह्यातून पुणतांबा-रोटेगाव रेल्वेमार्ग व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. औरंगाबाद ते पुणे हे रेल्वे प्रवासाचे अंतर ४२७ किमी आहे. रोटेगाव येथून रेल्वे अगोदर ५४ किमी प्रवास करून मनमाडला जाते नंतर ६७ किमी उलट प्रवास करून पुणतांबा येथे येऊन नगर दौंडमार्गे पुण्याला जाते. प्रत्यक्षात रोटेगाव पुणतांबा हे अंतर केवळ २५ किमी एवढेच आहे. त्यामुळे येथून रेल्वे मार्ग व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास सुरुवात झाली होती. काही वर्षांपूर्वी या मार्गाचे नकाशावरून रेल्वे अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण केले असल्याचे समजते. रोटेगाव, वैजापूर, खंडाळा, डबाळा, किरतपूर, भऊर, खोपडी, पुरणगाव, लाखगंगा, बापतरा, डोणगाव या गावावरून रेल्वेमार्ग जाणार असल्याचे सर्वेक्षणावरून दिसते.

रेल्वेमार्गावर येणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलाचा खर्च वाचविण्यासाठी नवीन रेल्वेमार्ग बापतरा डोणगाव असा असून डोणगावाजवळ दौंड-मनमाड रेल्वे मार्गाला जोडला जाणार असल्याची चर्चा आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन याबाबतचा अहवाल रेल्वे खात्याला सादर करण्यात आला आहे. मात्र गेल्या चार वर्षांत याबद्दल कुठलीच कार्यवाही झालेली नाही. रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग झाल्यास आंध्रप्रदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

हा रेल्वे मार्ग राहाता व वैजापूर तालुक्याच्या विकासाच्या आणि दळणवळणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. या मार्गासाठी पुणतांबा परिसर अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com